चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-जुना अकलूज रस्त्यावर सुरू असलेल्या अवैध वाळू वाहतुकीचा पर्दाफाश करत पंढरपूर शहर पोलीसांनी एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एक टाटा कंपनीची इंन्ट्रा वाहन व त्यामधील अंदाजे पाऊण ब्रास वाळू जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणी वाहनचालक शुभम प्रभाकर यादव (रा. दुध डेअरी जवळ, इसबावी, ता. पंढरपूर) याच्याविरुद्ध बीएनएस कलम ३०३(२) व गौण खनिज कायदा कलम ४(१), ४(क), २१ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
१ जूनच्या रात्री ११ वाजल्यापासून २ जूनच्या पहाटे ५ वाजेपर्यंत पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत रावसाहेब घुगरकर यांनी पोहेकॉ गोडसे आणि चालक पोकॉ माने यांच्यासह नाईट पेट्रोलिंग सुरू ठेवले होते. दरम्यान, गुप्त बातमीदारामार्फत जुना अकलूज रोडवर वाळूच्या अवैध वाहतुकीची माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले.
पोलीसांचे पथक जॅकवेल परिसरात पोहोचले असताना एक पांढऱ्या रंगाची टाटा इंन्ट्रा गाडी त्यांना संशयास्पद वाटली. वाहन थांबवून विचारपूस केली असता चालकाने आपले नाव शुभम प्रभाकर यादव असे सांगितले. वाहनाची पाहणी केली असता त्यामध्ये परवानगीशिवाय वाळू आढळली.
सदर वाहनाच्या पाठीमागील हौदामध्ये पाऊण ब्रास वाळू होती. वाहनावर कोणतीही नंबर प्लेट नव्हती. वाहनाची किंमत ₹५०,००० तर वाळूची किंमत ₹६,००० असल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. दोन्ही मिळून अंदाजे ₹५६,००० चा मुद्देमाल जप्त करून पोलीस ठाण्यात जमा करण्यात आला.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक विश्वजित भगवानराव घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला असून, आरोपी शुभम यादव याच्याविरुद्ध पोलीसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला आहे.
स्थानिक नागरिकांतून प्रश्न उपस्थित केले जात आहेत की, अशा प्रकारची अवैध वाळू वाहतूक केवळ एका वाहनापुरती मर्यादित आहे का, की यामागे अधिक मोठा रॅकेट कार्यरत आहे? प्रशासनाने कठोर कारवाई करावी आणि वाळू माफियांवर नजरेखाली ठेवावे, अशी मागणीही जोर धरू लागली आहे.
पंढरपूर परिसरातील वाळू तस्करीविरोधात ही कारवाई एक सकारात्मक पाऊल असून, पोलीस यंत्रणेच्या तत्परतेचे कौतुक होत आहे. मात्र अशा अवैध व्यवसायांवर कायमस्वरूपी बंदी घालण्यासाठी स्थानिक प्रशासन, महसूल विभाग व पोलिसांनी एकत्रित योजना आखावी, अशी जनतेची मागणी आहे.
0 टिप्पण्या