चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर :-बार्शी शहरातील यशवंत नगर येथे भांडण मिटविण्यास गेलेल्या कुटुंबावर प्राणघातक हल्ला झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या प्रकरणी बार्शी शहर पोलीस ठाण्यात संबंधित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 च्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी दिनेश शंकर मस्के (वय 50 वर्षे, रा. यशवंत नगर, तुळजापूर रोड, बार्शी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, दिनांक 08 जून 2025 रोजी रात्री 9.30 च्या सुमारास त्यांचे पुत्र योगेश मस्के आणि सुरज चाँद मुल्ला यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांनी भांडण दुसऱ्या दिवशी मिटविण्याचा सल्ला दिला होता.
दिनांक 09 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजता फिर्यादी, त्यांचे नातेवाईक आणि काही ओळखीचे लोक भांडण मिटविण्यासाठी अस्लाम आत्तार यांच्या घराजवळ गेले असता, आरोपी सुरज निजाम आत्तार, सुरज चाँद मुल्ला, लाला मुल्ला, अस्लाम आत्तार आणि चाँद मुल्ला यांनी त्यांना शिवीगाळ करीत धमकावले. त्यानंतर अचानक सुरज मुल्ला याने कोयत्याने सुमित मस्के यांच्या पाठीवर वार करून गंभीर जखमी केले. तसेच आकाश खैरे व सुरज आत्तार यांनी काठीने योगेश मस्के यांच्या डोक्यावर मारहाण केली. लाला मुल्ला यानेही काठीने वार केले आणि भांडण सोडविणाऱ्या अन्य नातेवाईकांवरही हल्ला केला.
या गोंधळात सुरज मुल्ला याने योगेश मस्के यांच्या गळ्यातील 15 ग्रॅम वजनाची सोनसाखळी जबरदस्तीने ओढून घेतली. हल्ल्यात जखमी झालेल्यांना ग्रामीण रुग्णालय बार्शी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे तातडीने तक्रार दाखल करण्यात आली नव्हती.
या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) 2023 अंतर्गत कलम 115(2) (प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न), 118(1), 119(1), 189(2), 190, 191(2), 191(3), आणि 352 (मारहाण) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक बालाजी अंकुश कुकेडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या प्रकरणात आरोपींचा लवकरात लवकर शोध घेऊन कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. नागरिकांनी कोणतीही माहिती असल्यास पोलीस ठाण्याशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0 टिप्पण्या