सुजित एस. धनवे उपसंपादक महाराष्ट्र राज्य.
मो. नं. 7058137098/9615179615
जामखेड :- जामखेड शहरातील सदाफुले वस्ति परिसरात दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी स्कुटीवरून जात असलेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मिनी गंठण हिसकावून नेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विकीभाऊ सदाफुले, उमर कुरेशी, राजेंद्र सदाफुले, सामाजिक कार्यकर्ते नासिर चाचू सय्यद, अनिल सानप आदींनी शिष्टमंडळासह पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांची भेट घेऊन आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच लवकरात लवकर तपास न झाल्यास आंदोलनाचा इशाराही दिला.
दरम्यान, पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी तपास प्रकरणी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले आहे.
फिर्यादी पल्लवी अनिल सानप (वय २८, रा. सदाफुले वस्ति, ता. जामखेड) यांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. २७ ऑक्टोबर रोजी सायं. ७:१० वाजता त्या त्यांच्या भाची वेदीका अशोक डोंगरे हिच्यासोबत अॅक्टीव्हा स्कुटी (क्र. MH16 DT 6551) वरून घरी जात असताना ही घटना घडली. मधुकर दळवी यांच्या केशकर्तनालयासमोर पाठीमागून आलेल्या शाईन मोटारसायकलवरील दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील १८ ग्रॅम वजनाचे (मूल्य सुमारे ₹५५,०००) सोन्याचे मिनी गंठण हिसकावून पळ काढला.
महिलेने व तिच्या भाचीने चोरट्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला, मात्र चोरटे भरधाव वेगाने मोटारसायकल चालवत पसार झाले.
या प्रकरणी गु. क्र. ०५८०/२०२५, भा. द. सं. कलम ३९२ अन्वये दोन अज्ञात चोरांविरुद्ध जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल जितेंद्र सरोदे पुढील तपास करत आहेत.
या घटनेमुळे सदाफुले वस्तीत दहशतीचे वातावरण असून नागरिकांनी पोलीस गस्त वाढवावी व महिलांच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी केली आहे.


0 टिप्पण्या