Ticker

6/recent/ticker-posts

शालार्थ वेतन घोटाळ्याचा मोठा पर्दाफाश; माजी शिक्षणाधिकारी अटकेत, १२ कोटींच्या अपहारप्रकरणी २७ जणांना अटक

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर :-शिक्षण विभागातील शालार्थ ऑनलाईन वेतन प्रणालीचा गैरवापर करून शिक्षक भरती व वेतन वितरणात करण्यात आलेल्या कोट्यवधींच्या आर्थिक घोटाळ्याचा तपास अधिक गतीने पुढे सरकत आहे. या प्रकरणात माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना अटक करण्यात आली असून, आतापर्यंत एकूण २७ आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

तपासात उघड झालेल्या माहितीनुसार, अस्तित्वात नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या नावाने बनावट शालार्थ आयडी तयार करण्यात आले. या डमी नावांवर वेतन व विविध भत्ते काढून १२ कोटी रुपयांपेक्षा अधिक रकमेचा अपहार केल्याचा प्राथमिक अंदाज तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे.
या घोटाळ्यात तीन शिक्षण उपसंचालक, चार शिक्षणाधिकारी, वेतन अधीक्षक, तीन मुख्याध्यापक, दोन शाळा संचालक, सहाय्यक शिक्षक तसेच सहा लिपिक व कनिष्ठ लिपिकांचा सहभाग असल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.

२०१९ ते २०२२ या कालावधीत संबंधित अधिकारी विविध पदांवर कार्यरत असताना, कोणतीही सखोल चौकशी न करता वेतन प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. बनावट आयडी असूनही त्यावर दीर्घकाळ वेतन काढले जात असल्याने सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक बोजा पडल्याचे समोर आले आहे.

या प्रकरणाचा उलगडा सायबर पोलिस ठाण्यात दाखल तक्रारीनंतर झाला. त्यानंतर विशेष तपास पथक (SIT) ने चौकशी सुरू करत अनेक कागदपत्रे, डिजिटल डेटा आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार हस्तगत केले आहेत.
अटक करण्यात आलेले माजी शिक्षणाधिकारी रवींद्र काटोलकर यांना न्यायालयात हजर करण्यात आले असून, २५ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. तपास अधिक खोलवर सुरू असून, आणखी वरिष्ठ अधिकारी व मोठी नावे समोर येण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिक्षण व्यवस्थेतील हा कोट्यवधींचा घोटाळा इथेच थांबणार, की अजून धक्कादायक खुलासे होणार—याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या