Ticker

6/recent/ticker-posts

नांदणी चेकपोस्टवर लाचखोरीचा भांडाफोड! अवजड वाहन सोडण्यासाठी ३ हजारांची मागणी; वाहतूक निरीक्षकासह खासगी एजंट रंगेहाथ अटकेत

चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:-महाराष्ट्र–कर्नाटक सीमेवरील नांदणी तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या लाचखोरीचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पर्दाफाश केला आहे. अवजड वाहन पुढे सोडण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती अडीच हजार रुपये स्वीकारणाऱ्या वाहतूक निरीक्षकासह त्याच्या खासगी एजंटला जालन्याच्या एसीबी पथकाने रंगेहाथ पकडले.

तानाजी शिवाजी धुमाळ (वाहतूक निरीक्षक) व अमोल आप्पासाहेब पाटील (खासगी व्यक्ती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी मंद्रुप पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार मूळचा बार्शी येथील असून त्याचे कंटेनर गुजरात–चेन्नई या मार्गावर नियमित ये-जा करतात. नांदणी चेकपोस्टवरून वाहन पास करण्यासाठी यापूर्वी दोन हजार रुपये घेतले जात होते. मात्र, वाहन परत पास करण्यासाठी पुन्हा लाच मागितली जात असल्याने तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेतली.

त्यानुसार २५ डिसेंबर रोजी सापळा रचण्यात आला. तक्रारदार परमीटसाठी वाहतूक निरीक्षक धुमाळ यांच्या कार्यालयात गेला असता, तेथे खासगी व्यक्ती अमोल पाटील याने तीन हजार रुपयांची मागणी केली. अखेर अडीच हजार रुपयांवर तडजोड ठरली. ही रक्कम स्वीकारून धुमाळ यांच्या समोरील टेबलाच्या ड्रॉवरमध्ये ठेवण्यात आली.

याच क्षणी उपअधीक्षक बाळू जाधवर यांच्या नेतृत्वाखालील एसीबी पथकाने धडक कारवाई केली. तपासात धुमाळ यांच्याकडे महागडा मोबाईल, स्मार्ट वॉच, ब्लूटूथ आढळले, तर अमोल पाटीलकडे ११ हजार ८१० रुपये रोख, मोबाईल, दोन अंगठ्या व सोनसाखळी मिळून आली. तसेच टेबलच्या ड्रॉवरमध्ये २४ हजार ३९० रुपये रोख जप्त करण्यात आले.

सीमेवरील तपासणी नाक्यावर सुरू असलेल्या गैरप्रकारांमुळे पुन्हा एकदा प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या कारवाईमुळे वाहतूक विभागात खळबळ उडाली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या