आमदार राजेश पाडवी यांनी रस्त्याकडे लक्ष द्यावे, ग्रामस्थ आक्रमक !
चित्रा न्युज प्रतिनिधी
शहादा :- शहादा तालुक्यातील निंबर्डी ते सातपिपरी नवागांव दरा पिपरी वाया राणीपूर पर्यंतच्या १२ किलोमीटर रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्ती करा,अशी मागणी बिरसा फायटर्स नंदूरबार संघटनेकडून कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, राज्याध्यक्ष गोपाल भंडारी,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,आकाश तडवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. आमदार राजेश पाडवी यांनी या रस्त्याकडे लक्ष द्यावे,अशी प्रतिक्रिया निंबर्डी ग्रामस्थांनी विडीओतून दिली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, शहादा तालुक्यातील निंबर्डी ते सातपिपरी दरा पिपरी वाया राणीपूर या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.हा रस्ता अत्यंत खड्डेमय झाला असून वाहनधारकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. हा रस्ता अत्यंत खड्डेमय, धोकादायक झाला आहे. रस्त्यावर मोठ -मोठे खड्डे म्हणजेच ५ फूट खोल खड्डे पडले आहेत.
सरकारी ग्रामीण रूग्णालय म्हसावद हे राणीपूर येथे स्थलांतरित केल्यामुळे निंबर्डी नवागांव कन्साई इत्यादी गांवातील रूग्णांना आता या रस्त्यावरून राणीपूर येथील रूग्णालयात न्यावे लागते. हा एकमेव मार्ग असल्याकारणाने वाहनांची मोठी वर्दळ असते.ठेकेदार व बांधकाम विभागाने केलेल्या भ्रष्टाचारामुळे या रस्त्याचे बारा वाजले आहेत.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता अशी रस्त्यांची भयानक अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांमध्ये व प्रवाशांमध्ये संताप निर्माण झाला आहे.या रस्त्यावरून गरोदर महिला,वयस्कर व आजारी नागरिकांना प्रवास नको झाले असून प्रवाशी हैराण झाले आहेत. वाहन चालवतांना खड्डे चुकवताना प्रवाशांचा अपघात होत असून दुखापत होत आहे. या रस्त्यावरून प्रवास करतांना प्रवाशी जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. या रस्त्यावरून प्रवास करताना कोणत्याही क्षणी अपघात होऊ शकतात म्हणून तातडीने निंबर्डी ते सातपिपरी नवागांव दरा पिपरी वाया राणीपूर १२ किलोमीटर या रस्त्यावरील खड्डे तात्काळ बुजवून रस्ता दुरूस्त करण्यात यावा,हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशारा बिरसा फायटर्स संघटनेकडून देण्यात आला आहे.


0 टिप्पण्या