चित्रा न्युज प्रतिनिधी
अकलूज :-दिनांक 10 फेब्रुवारी रोजी शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूलमध्ये सर्वांना उत्सुकता लागून राहिलेला मी सावित्री होणार गं! हा महिलांसाठी हळदीकुंकवाचा कार्यक्रम रोजच्या कामातून विरंगुळा मिळावा या उद्देशाने आयोजित केला होता. शिवरत्न सेमी इंग्लिश स्कूल आणि चंदुकाका सराफ बारामतीकर (शाखा अकलूज) यांच्या संयुक्त विद्यमाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती अक्कासाहेब उर्फ इशिता देवी धैर्यशील मोहिते पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यांच्याच हस्ते कार्यक्रमाचा श्री गणेशा झाला. कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचा तसेच स्पॉन्सर्सचा सत्कार प्रशालेचे मुख्याध्यापक मा.श्री जितेंद्र माने देशमुख सरांनी केला.
जवळपास 300 महिलांच्या उपस्थितीत हा दिमाखदार कार्यक्रम संपन्न झाला.
कार्यक्रमात महिलांसाठी वेगवेगळे मनोरंजक खेळ घेण्यात आले. विशेष म्हणजे प्रत्येक खेळात सर्वच महिला हिरीरीने सहभागी होत होत्या. त्यामध्ये डोक्यावर ग्लास उपडा ठेवून चालणे, तळ्यात मळ्यात, संगीत नारळ यासारख्या भन्नाट खेळात सर्वच महिलांनी खिलाडू वृत्तीने सहभाग घेतला. त्यांच्यातली चुरस पाहून अक्षरशः नियोजकांचे धाबे दणाणले आणि एकच हास्यकल्लोळ उडाला. या तीनही स्पर्धेतून प्रथम तीन क्रमांक काढून बक्षीस देण्यात आले तसेच तिन्ही खेळातून प्रथम आलेल्या तीन महिलांसाठी प्रश्नमंजुषा हा पैठणीचा खेळ घेण्यात आला.
महिलांनी हे खेळ खेळत असताना त्यांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता पाहून वातावरण आनंदाने न्हाऊन निघाले.
खेळ फक्त पैठणीचा नव्हता तर प्रत्येक स्त्रीला सावित्री होण्याचा अनुभव देणारा होता. महिला प्रेक्षकांसाठी देखील प्रश्न विचारून योग्य उत्तराला बक्षिसे देण्यात आली. प्रत्येक वर्गातील महिलेला बक्षीस मिळावे याचा विचार करून शैक्षणिक, धार्मिक, सांस्कृतिक,राजकीय, मनोरंजन यासारख्या विषयावर प्रश्न विचारण्यात आले. अगदी परीक्षकांना देखील नंबर काढताना संभ्रम व्हावा अशा चुरशीने सर्वच महिला प्रत्येक खेळात हिरीरीने सहभागी होत होत्या त्यामुळे शोभेत अधिकची भर पडली.
प्रणव साडी सेंटर च्या सर्वेसर्वा सौ सीमा जाधवर यांच्याकडून प्रथम क्रमांकाची पैठणी जाहीर झाली. द्वितीय क्रमांकासाठीचं बक्षीस शेंडगे असोसिएट्स चे सर्वेसर्वा जयदीप शेंडगे यांच्याकडून देण्यात आले. तर तृतीय क्रमांकाचे बक्षीस विरा मोबाईल शॉपी यांच्याकडून जाहीर झाले. या तिन्ही बक्षीसांव्यतिरिक्त I Champ Abacus Pvt Ltd यांच्याकडून आकर्षक अशी आठ बक्षिसे तसेच प्रेक्षका ंमध्ये देण्यात आलेली सर्व बक्षिसे प्रशालेचे शिक्षक - पालक संघाचे उपाध्यक्ष मा.श्री सचिन बोरावके सरांकडून जाहीर करण्यात आली तर कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्वच महिलांना वाण म्हणून चंदूकाका सराफ यांच्याकडून आकर्षक भेटवस्तू देण्यात आली.
प्रथम क्रमांक म्हणजेच पैठणीच्या मानकरी ठरल्या सौ. रोहिणी सागर जठार, द्वितीय क्रमांक सौ अमृता बाळासाहेब फुले, तर तृतीय क्रमांक सौ निमा मुकेश गुर्जर... यांनी पटकावला.
कार्यक्रमासाठी निवेदक म्हणून प्रशालेतील शिक्षिका शिल्पा जाधव आणि तमन्ना नाईकवाडी यांनी काम पाहिले तसेच कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी सर्व स्टाफचे सहकार्य लाभले. या आगळ्या-वेगळ्या कार्यक्रमाची रंगत वाढवणारी म्युझिक सिस्टीम प्रशालेतील संगीत शिक्षक श्री गणेश शेवकर सरांनी उत्कृष्टरित्या पार पाडल्यामुळे महिलांनी गाण्याच्या तालावर थिरकत कार्यक्रमाचा पुरेपूर आनंद घेतला. असा हा बहारदार सोहळा अकलूज आणि यशवंत नगर परिसरात चर्चेचा विषय ठरला.


0 टिप्पण्या