सोलर ग्राहकांना अखेर वीज बिल मिळाले
चित्रा न्युज प्रतिनिधी
भद्रावती : ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असून गौतम नगर परिसरातील सोलर मीटरधारक वीज ग्राहकांना प्रलंबित वीज बिले वितरित करण्यात आली आहेत. या कारवाईमुळे अनेक दिवसांपासून संभ्रमात असलेल्या ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे.
दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावतीच्या वतीने सोलर मीटरधारक ग्राहकांना नियमित वीज बिले मिळत नसल्याबाबत लेखी तक्रार सादर करण्यात आली होती. या पत्रात ग्राहकांना येणाऱ्या अडचणींचा सविस्तर उल्लेख करून तातडीने दखल घेण्याची मागणी करण्यात आली होती. तक्रारीची गंभीर दखल घेत महावितरण कंपनी प्रशासनाने तत्काळ कार्यवाही सुरू केली.
त्याच अनुषंगाने आज दि. १३ फेब्रुवारी २०२६ रोजी गौतम नगर, भद्रावती येथील सोलर मीटर वीज ग्राहकांना वीज बिलांचे वितरण करण्यात आले. अनेक ग्राहकांना दीर्घकाळ बिल न मिळाल्याने आर्थिक नियोजनात अडचणी येत होत्या. मात्र ग्राहक पंचायतच्या प्रयत्नांमुळे ही समस्या मार्गी लागल्याने नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी फोनद्वारे शाखेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली.
या यशस्वी पाठपुराव्यामध्ये शाखेचे अध्यक्ष प्रवीण चिमुरकर, सचिव वतन लोणे, डॉ. ज्ञानेश हटवार, भारत खोब्रागडे, विनोद ठमके, सोनल वावरे, गुरूदेव बावणे, करूणा मोघे, प्रतिक्षा बनकर यांनी सक्रिय सहभाग घेतला. ग्राहक पंचायत महाराष्ट्र शाखा भद्रावती तर्फे भविष्यातही नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्यात येतील असे पदाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.


0 टिप्पण्या