Ticker

6/recent/ticker-posts

ग्राम मुंडीपार येथे राजाभोज जयंती उत्सव उत्साहात साजरा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
गोरेगाव :तालुक्यातील ग्राम मुंडीपार येथे आज, दिनांक ८ फेब्रुवारी २०२६ रोजी (रविवार) चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांच्या जयंतीनिमित्त भव्य व उत्साहपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात माता गटकालिका व राजाभाऊ यांच्या प्रतिमेचे विधिवत पूजन करून करण्यात आली. त्यानंतर माता चौक येथील माता माय विठ्ठल मंदिर व दुर्गा मंदिर येथे पूजन संपन्न झाले.
त्यानंतर चक्रवर्ती सम्राट राजा भोज यांच्या प्रतिमेचे माल्यार्पण करून भव्य महारॅली काढण्यात आली. या महारॅलीमध्ये रेहका, खाचर, रेडू, बैलबंडी, ट्रॅक्टर, घोडा तसेच राजा राजाभोज यांच्या आकर्षक झांकीसह डफलीबाजा, बासरी, झुंजुना आदी पारंपरिक वाद्यांच्या गजरात वातावरण भारावून गेले होते. ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग आणि जयघोषांमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय व जल्लोषपूर्ण झाला.
सदर जयंती उत्सव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपसभापती, पंचायत समिती गोरेगाव श्री. सुरेंद्रजी बिसेन होते. सदस्य जिल्हा परिषद गोंदिया श्री. ससेन्द्रजी भगत यांनी उपाध्यक्षपदी प्रमुख उपस्थिती दर्शविली. उद्घाटक म्हणून क्षत्रिय पोवार समाज संघटना, तालुका गोरेगावचे सचिव श्री. आनंदजी पटले उपस्थित होते, तर दीपप्रज्वलक म्हणून पंचायत समिती सदस्य सौ. शितलताई बिसेन यांनी मानाची भूमिका पार पाडली.
कार्यक्रमाच्या शेवटी क्षत्रिय पोवार समाज संघटना, मुंडीपार यांच्या वतीने समाज बांधव व भगिनींसाठी महाप्रसाद व भोजनाची व्यवस्था करण्यात आली होती. या प्रसंगी उपस्थितांनी महाप्रसादाचा लाभ घेत सामाजिक ऐक्य व बंधुभाव वृद्धिंगत केला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थ व क्षत्रिय पोवार समाज संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले असून संपूर्ण उत्सव भक्ती, परंपरा आणि सामाजिक एकात्मतेचा सुंदर संगम ठरला.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या