Ticker

6/recent/ticker-posts

करंजेकर फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिन


चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:-वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित, बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी येथे राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. राष्ट्रीय फार्मसी शिक्षण दिनाच्या निमित्ताने बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ( BKCP ) साकोली येथे फार्मा अन्वेषण २०२६  कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले. बदलत्या फार्मास्युटिकल परिसंस्थेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणे तसेच त्यांना संशोधन उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राकडे प्रेरित करणे हा कार्यक्रम आयोजन करण्यामागचा उद्देश होता. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने करण्यात आली. व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून महाविद्यालयाच्या विविध शैक्षणिक व सहशैक्षणिक उपक्रमांची माहिती देणारे व्हिडिओ सादरीकरण दाखविण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी डी. फार्म विभाग प्रमुख प्रा. विरेंद्र मिश्रा यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाचे उद्दिष्ट स्पष्ट केले. प्रा. आश्विन वंजारी यांनी विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासोबतच शैक्षणिक व संशोधन उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर असलेल्या सोनाली पडोळे कार्यकारिणी सदस्य, महाराष्ट्र राज्य फार्मसी परिषद यांनी बहुमूल्य मार्गदर्शन केले. त्यांनी आपल्या भाषणात औषध व्यवसायातील नैतिकता, नियामक ज्ञान आणि आरोग्यसेवेत फार्मासिस्टची महत्त्वपूर्ण भूमिका यावर सविस्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विशेष अतिथी म्हणून क्रांतिकुमार ढेंगे सचिव भंडारा जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन, साकोली तालुका औषध विक्रेता संघटनेचे अध्यक्ष हिरालाल पारधीकर, उद्योजक प्रवीणभाई पटेल यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमास वैनगंगा बहुउद्देशीय विकास संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रह्मानंद करंजेकर, संस्था अध्यक्ष डॉ. सोमदत्त करंजेकर, संस्थेच्या सचिव डॉ. वृंदाताई करंजेकर, व्यवस्थापन समिती सदस्य डॉ. लोकानंद नवखरे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आतिश शहारे यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी उपस्थित मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कार्यक्रम समन्वयक प्रा. डॉ. चंद्रशेखर चकोले यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या