चित्रा न्युज प्रतिनिधी
भंंडारा :-गुरुदेव सेवा मंडळ गणेशपूर यांच्या वतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. सर्वप्रथम गणेशपूर येथील गुरुदेव सेवा मंडळ प्रार्थना सभागृहात सकाळी ५.३० वाजता ध्यान, ६.०० वाजता भजन, ग्रामगीता व सामुदायिक प्रार्थना आदी कार्यक्रम संपन्न झाले. भंडारा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या प्रतिमा स्थळी गुरुदेव सेवा मंडळाच्या सेवकांनी टाळ-मृदंगाच्या साथीने “तुकडोजी के गुरुदेव हमारा प्यारा”, “येशील गुरु राजे”, “कधी येशील मनमोहना”, “दिल मन से गाऊंगा”, “तुकडोजी बाबाजी”, “दिलभर पाहू तुला”, “हरी नाम हे”, “मनाला स्थिर करावे” इत्यादी एकापेक्षा एक सुंदर भजनांनी संपूर्ण वातावरण भक्तिमय केले.
या प्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे सर्वश्री बाबुराव डोये, नामदेव आवरकर, प्रभुदास पराते, जवाहर निर्वाण, चुन्नीलाल भुरले, गोविंद गोखले, मोहनलाल वंजारी, युवराज हरडे, पुरुषोत्तम गायधने, अशोक साकुरे, नोंदराज शिवरकर, सुखदेव साठवणे, किंदर्ले, गजानन पडोळे,बाळकृष्ण तोरणकर आदी उपस्थित होते.
या वेळी सर्वांत ज्येष्ठ ८६ वर्षीय तुकडोजी महाराजांचे जवळचे सेवक ह.भ.प. श्री बाबुराव डोये यांनी सांगितले की, “तुकडोजी महाराजांनी ग्रामगीतेच्या माध्यमातून ग्रामविकास हा राष्ट्राची पायाभरणी आहे असा संदेश दिला. त्यांनी गावकऱ्यांना आत्मनिर्भर होण्याचे, गाव स्वच्छ ठेवण्याचे व परस्पर सहकार्याने विकास साधण्याचे धडे दिले. त्यांचे मत होते की" ईश्वर मंदिरांत नसून माणसांत वास करतो. मानवसेवा हीच ईश्वरसेवा असून गरीब व गरजूंची सेवा हीच खरी पूजा आहे. त्यांनी सर्व समाजघटकांनी एकत्र राहावे असा संदेश दिला.”
निर्वाण परिवाराच्या वतीने संत गुलाब बाबांच्या हस्ते १९८३ मध्ये तुकडोजी महाराजांच्या प्रतिमेचे अनावरण करण्यात आले होते. तेव्हापासून या भव्य वडाच्या झाडाजवळील तुकडोजी महाराजांच्या प्रतिमा स्थळी दरवर्षी त्यांची जयंती व पुण्यतिथी साजरी केली जाते.


0 टिप्पण्या