चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:साकोली शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या तलाव पाळीच्या पुनर्बांधणीसाठी स्थानिक नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने आमदार नानाभाऊ पटोले यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशा परिस्थितीत फुटलेल्या तलाव पाळीची तातडीने दुरुस्ती न झाल्यास साकोली परिसरात मोठे जन-धन नुकसान होण्याची भीती आहे. ही गंभीर बाब लक्षात घेऊन इंजि. संदीप बावनकुळे नगरसेवक तथा गटनेता, कुणाल राऊत, त्रिवेणी चौधरी, सायली दोनोडे, वैशाली लांजेवार, स्मिता सिडाम, निर्मला नंदेश्वर (सर्व नगरसेविका) आणि ओम गायकवाड यांनी आमदारांना प्रत्यक्ष भेटून कामाचे गांभीर्य पटवून दिले. शिष्टमंडळाची कैफियत ऐकून घेतल्यावर आमदार नानाभाऊ पटोले यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेतली. त्यांनी तत्काळ मुंबई येथील संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. पावसाळ्यापूर्वी हे काम कोणत्याही परिस्थितीत पूर्ण झाले पाहिजे आणि युद्धपातळीवर कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तलावाची पाळ फुटल्यामुळे परिसरातील शेती आणि नागरी वस्त्यांना मोठा धोका निर्माण झाला आहे. गेल्या पावसाळ्यात झालेल्या नुकसानीची पुनरावृत्ती टाळण्यासाठी हे काम तातडीने मार्गी लावण्याची मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली होती.


0 टिप्पण्या