Ticker

6/recent/ticker-posts

नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना आता नाईट सफारीची पर्वणी


  

 महाराष्ट्र दिनापासून नव्याने ४ प्रवेशद्वारातून प्रवेश 

रवि भोंगाने चित्रा न्युज 
साकोली:-  साकोली पासून अवघ्या २२ कि.मी. अंतरावर असलेल्या नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात आता नाईट सफारी सुरू होणार असून पर्यटकांना आनंदमय पर्वणी ठरणार आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये विशेष आनंद पसरलेला आहे. विशेष म्हणजे बफर क्षेत्रामध्ये रात्री सफारीचा आनंद उपलब्ध होणार असल्याने ताडोबा आणि पेंच व्याघ्र प्रकल्पानंतर नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाकडे पर्यटकांची संख्या वाढण्यात असल्याची माहिती आहे. यापूर्वी नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पात चार गेटमधून प्रवेश मिळत होता. पिटेझरी, मुरदोली, बोदलकसा आणि चोरखमारा. यानंतर महाराष्ट्र दिन म्हणजे १ मे २०२६ पासून नव्याने ४ प्रवेशद्वारातून व्याघ्र प्रकल्पात प्रवेश मिळणार आहे.
सविस्तर वृत्त असे की, राज्य सरकारने या प्रकल्पाचे १३०१.८८३ चौरस कि.मी. क्षेत्र एकत्रित केल्यामुळे त्याची व्याप्ती वाढलेली आहे. पर्यटकांना याचा थेट लाभ मिळावा याकरिता नवेगावबांध परिसरातील माधवझरी जांभळी ( दोडके ) मुरदोली ( गोरेगाव ) आणि पांगडी ( गोंदिया ) अशी ४ नवीन प्रवेशद्वारे सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये भंडारा जिल्ह्यातील गडेगाव डेपो येथील एका महत्त्वाच्या प्रवेशद्वाराचाही समावेश आहे. या नवीन गेटमुळे पर्यटकांची गर्दी विभागली जाऊन त्यांना अधिक शांत आणि विस्तीर्ण जंगल सफारीचा अनुभव घेता येईल. दरम्यान नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पातील स्थानिकांचे जीवनमान उन्नतीसाठी टाटा समूहने पुढाकार घेतलेला आहे. या उपक्रमांतर्गत ६० ते ७० गावांचा समूह तयार करून स्थानिकांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामध्ये कापडी पिशव्या तयार करणे, संकरित गाईंचे वाटप, आदिवासी कलाकुसर व पेंटिंग, मशरूम उत्पादन तसेच बुरुड कामाचे प्रशिक्षण इत्यादींचा समावेश आहे. या उत्पादनांना हक्काची बाजारपेठ सुद्धा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
______________________________________________

                    प्रशासकीय अडथळे दूर

२०१७ मध्ये प्रकल्पाचे बफर क्षेत्र जाहीर झाले होते. मात्र त्याचे व्यवस्थापन प्रादेशिक वनविभाग आणि एफडीसीएम अशा वेगवेगळ्या विभागाकडे असल्याने प्रशासकीय अडचणी निर्माण झालेल्या होत्या. आता शासन निर्णयानुसार संपूर्ण बफर क्षेत्राचे नियंत्रण व्याघ्र प्रकल्पाच्या छत्राखाली आलेले आहे. यामुळे मानव वन्यजीव संघर्ष कमी करण्यास मदत होणार असून नागरिकांच्या प्रलंबित समस्याचेही तातडीने निराकरण शक्य होईल. या नवीन रचनेनुसार उमरझरी, तिरोडा, सडकअर्जुनी ,देवरी कोका गडेगाव यासह १२ वनपरिक्षेत्र कार्यालयाचे कार्यान्वयन करण्यात आलेले आहे. त्यामुळे व्याघ्र प्रकल्पाच्या प्रशासकीय कामात मोठी सुसूत्रता येणार आहे. सध्या सदर व्याघ्र प्रकल्पात खाजगी वाहनांना प्रवेश बंदी असून केवळ वन विभागाच्या जिप्सीद्वारे सफारी करता येईल. नवीन ४ गेट साठी प्रत्येकी ६ अशा एकूण ४० नवीन जिप्सीची व्यवस्था केली जाणार आहे. सध्या प्रकल्पात एकूण ६८ जिप्सी असून त्यापैकी एकट्या पीटेझरी गेटवर २५ वाहने उपलब्ध आहेत. वन्यजीव संरक्षणासाठी ७२ कोचिंग कॅम्प लावण्यात आले असून १४४ मजूर अहोरात्र पहारा देत आहेत. या व्यतिरिक्त १६ नाके आणि वायरलेस कॅम्पच्या माध्यमातून संपूर्ण जंगलावर लक्ष ठेवले जाणार आहे.
_______________________________________________

ताडोबा आणि पेंचच्या धरतीवर आता नागझिरा-नवेगाव व्याघ्र प्रकल्पाचा विकास केला जात आहे. पर्यटकांना उत्तम जंगल सफारीचा आनंद मिळावा आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून स्थानिकांना शाश्वत रोजगार प्राप्त व्हावा हा आमचा मुख्य उद्देश आहे. १मे पासून सुरु होणाऱ्या नवीन गेटमुळे पर्यटनाला नवी चालना मिळेल.

प्रीतमसिंग कोडापे.
उपसंचालक, नागझिरा-नवेगाव व्याघ्र

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या