Ticker

6/recent/ticker-posts

पिंपळगाव/सडक येथे घराला व गोठ्याला भीषण आग; हजारोंचे नुकसान


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा :- लाखनी तालुक्यातील पिंपळगाव/सडक येथे दुपारच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत घर व लगतचा गोठा जळून खाक झाला. या आगीत मोठे आर्थिक नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, येथील संजय प्रभाकर तवाडे यांच्या घराला दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास इलेक्ट्रिक शॉर्टसर्किटमुळे आग लागली. आग वेगाने पसरत घरातील वस्तूंसह शेजारील गोठ्यालाही लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने घराचे मोठे नुकसान झाले.
या आगीत घरावरील कवेलू सुमारे ५ हजार नग (अंदाजे १५ हजार रुपये), मंगळ्या ४० नग (८ हजार रुपये), फाटे १५० नग (१५ हजार रुपये), बांबू/बाशा ३०० नग (१२ हजार रुपये), तसेच रेशन दुकानातील गहू १० पोते (१५ हजार रुपये) व तांदूळ ६ पोते (१० हजार रुपये) जळून खाक झाले. एकूण अंदाजे ८१ हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाज आहे.
घटनेची माहिती मिळताच ग्राम महसूल अधिकारी मयूर पाटील, पोलीस पाटील सुरेश मते व ग्राम रोजगार सेवक रविंद्र नवघरे यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तसेच ग्रामस्थांनी तत्काळ मदत करत आग विझवण्याचा प्रयत्न केला.
युवराज हेमने, मंगेश तरोणे, मनोज कमाने, प्रफुल्ल उडके यांच्यासह इतर ग्रामस्थांनी धाव घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी मोलाचे सहकार्य केले. त्यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळली असून पुढील अनर्थ टळला.
या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून नागरिकांनी वीज यंत्रणेची तपासणी करण्याची मागणी केली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या