पावसाळा तोंडावर तरीही तलाव पाळ नादुरुस्त
रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली:- सरकारी काम आणि वर्षभर थांब अशी आपल्याकडे ग्रामीण भागात म्हण आहे. एक वर्ष उलटायला केवळ दोन-तीन महिन्याचा अवधी असतांनासुद्धा फुटलेल्या तलाव पाळीचे काम अद्यापही पूर्ण होऊ शकले नाही. सरकारचे सांग कामें धोरण आणि नागरिकांचे मरण याचे प्रत्यंतर सध्या या फुटलेल्या तलाव पाळीवरून साकोलीच्या नागरिकांना दिसून येत आहे. गत पावसाळ्यात साकोली शहरातील तलाव पाळ फुटलेली होती. त्यातील तलावाच्या पाळीला लागून असलेल्या शेकडो एकर शेत पिकाचे नुकसान झाले होते. इतकेच नव्हे तर लाखो रुपयांच्या मासोळी व्यवसायिकाचेही नुकसान झाले होते. त्यावेळी तलाव पाळ फुटल्याचे नुकसान झाल्याचे वृत्त प्रसिद्धी माध्यमात येताच त्यावेळी आमदार, खासदार आणि राजकारणी मंडळींनी या तलाव पाळीला भेट देऊन शेतकऱ्यांचे आणि मासोळी व्यवसायिकांचे सात्वन केलेले होते. तलाव पाळ बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन सर्व अग्रेसर नेत्यांनी त्यावेळी दिलेली होते. पण हे आश्वासन हवेत विरले. पुढील दोन महिन्यानंतर पावसाळा सुरू होणार आहे. फुटलेला तलाव पाळीचे बांधकाम न झाल्याने तलावात पाण्याच्या संचय तर होणारच नाही. त्यामुळे कोळी बांधवांच्या मासेमारी व्यवसायाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. मागील वर्षी या घटनेमुळे कोळी व्यवसायाचे मासोळी उत्पन्न धोक्यात आली होते. यावर्षीही पाणी संच नसल्याने मासोळी व्यवसायिकांचा व्यवसाय संकटात आलेला आहे.


0 टिप्पण्या