डॉ. अॅड. सुरेश माने, संपादक महादेव नरोटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील धुरिणांचा सन्मान; जनसेवेच्या अखंड यज्ञकुंडात समिधा अर्पण करणाऱ्या मान्यवरांचा गौरव
चित्रा न्युज प्रतिनिधी
सोलापूर:स्त्री शिक्षणाचे जनक आणि बहुजन समाजाचे उद्धारकर्ते क्रांतीसूर्य महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंतीचे ऐतिहासिक पर्व सध्या महाराष्ट्र अनुभवत आहे. या निमित्ताने त्यांच्या समतावादी विचारांचा जागर करण्यासाठी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेना आणि संघर्षनायक मीडिया यांच्या संयुक्त विद्यमाने 'संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार' वितरण सोहळा सोलापूरच्या डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृहात उत्साहात पार पडला. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक विचारांची पताका खांद्यावर घेऊन लढणाऱ्या समाजातील विविध घटकांचा यावेळी सन्मानाने गौरव करण्यात आला.
▪️विद्वत्ता आणि कर्तृत्वाचा संगम
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पँथर आर्मी स्वराज्य क्रांती सेनेचे संस्थापक प्रमुख संतोष आठवले होते. याप्रसंगी प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ डॉ. अॅड. सुरेश माने, 'दैनिक जनमत'चे संपादक महादेव नरोटे, सोलापूर जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी (सावकार) आणि धाराशिव जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य सुनील बनसोडे यांना त्यांच्या अजोड कार्याबद्दल 'संघर्षनायक राष्ट्रीय पुरस्कार' देऊन गौरवण्यात आले.
▪️"जनसामान्यांचा आवाज म्हणजे लोकशाहीचा आधार" – आ. सचिन कल्याणशेट्टी
या सोहळ्याला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी व्हिडिओ संदेशाद्वारे आपली उपस्थिती दर्शवली. त्यांनी गौरवोद्गार काढले की, "संघर्षनायक मीडियाने जनसामान्यांच्या व्यथा शासनापर्यंत पोहोचवून लोकशाहीचा चौथा स्तंभ खऱ्या अर्थाने मजबूत केला आहे. समाजातील उपेक्षितांसाठी झटणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, हा महात्मा फुलेंच्या विचारांचाच सन्मान आहे."
विविध क्षेत्रांतील 'योद्ध्यांचा' यथोचित सन्मान
▪️आत्मसन्मान गौरव पुरस्कार: दत्ता सूर्यवंशी (पुणे), ज्येष्ठ साहित्यिक भगवानराव धेंडे, विलास लोढे, सेवाव्रती अतिश शिरसट, संपादक प्रथमेश बनसोडे, शफी इनामदार, पत्रकार रूपाली अवचरे यांच्यासह २७ मान्यवरांनी हा बहुमान स्वीकारला.
▪️आदर्श समाज भूषण पुरस्कार: माजी सभापती नळपती बनसोडे, धनेश आचलारे, युवराज सरवदे, दयानंद बनसोडे आणि गणेश कोळी यांच्यासह १८ समाजसेवकांच्या सामाजिक कार्याचा गौरव करण्यात आला.
▪️आदर्श सरपंच पुरस्कार: ग्रामविकासाचा गाडा हाकणाऱ्या लक्ष्मीबाई गायकवाड (होटगी), नागराज पाटील (मुस्ती), विश्रांती पाटील (आचेगाव) आणि मदनराव कुलकर्णी (जालना) यांच्यासह १० सरपंचांना सन्मानित करण्यात आले.
▪️फुले यांच्या कार्याचा पुनरुच्चार
प्रमुख पाहुणे डॉ. अॅड. सुरेश माने यांनी आपल्या भाषणातून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. त्यांनी महात्मा फुले यांच्या सामाजिक क्रांतीचा पट उलगडत, आजच्या काळातही त्यांचे विचार कसे दीपस्तंभासारखे मार्गदर्शक आहेत, हे पटवून दिले.
यावेळी पँथर आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रकांत मुळे, महाराष्ट्र प्रभारी उमेश जामसंडेकर, प्रदेशाध्यक्ष प्रा. अरुण मेढे, महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा ज्योतीताई झरेकर, महेंद्र वाघमारे, आशा मोरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन आरोही जमादार यांनी केले. प्रास्ताविक उमेश जामसंडेकर यांनी मांडले, तर अमोल कुरणे यांनी आभार व्यक्त केले. दक्षिण विभाग प्रमुख सागर माने आणि जिल्हाध्यक्ष विनोद बनसोडे चेतन रुचनभैरे,अनिल राठोड, गणेश चव्हाण,गणेश बनसोडे,यांच्या नियोजनामुळे हा सोहळा अभूतपूर्व ठरला.


0 टिप्पण्या