Ticker

6/recent/ticker-posts

तलावांचा सम्राट असलेला साकोली तालुका पाण्यासाठी व्याकुळला


तलावांच्या तालुक्यात टँकरची शोकांतिका 


रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:- " धरण गावाला आणि कोरड घशाला " अशी एक म्हण वापरली जाते. अशातला काहीसा प्रकार साकोली तालुक्यात दिसून यायला लागलेला आहे. तलावांचा सम्राट असलेला साकोली तालुका थेंब न थेंब पाण्यासाठी व्याकुळलेलाअसून तलावांच्या तालुक्यातच नागरिकांना पाण्याचे टँकर पुरविण्याची शोकांतिका समोर आलेली आहे. सध्या तालुक्याच्या काही गावात पाणी समस्येने गंभीर रूप धारण केलेले आहे. त्यामुळे एप्रिल, मे आणि जून पर्यंत प्रशासनासमोर कडवे आव्हान समोर ठाकले आहे. दुसरीकडे साकोली-सेंदुरवाफा नगरपरिषद प्रभागात काही नगरसेवक वैयक्तिक पाणी टँकरने पाणी पुरवत आहेत. परंतु असे असले तरी पाण्याचे टँकर वैयक्तिक खर्चात कुठपर्यंत आणि किती पुरवावेत हा देखील प्रश्न  या निमित्ताने नगरसेवक यांच्या समोर निर्माण झालेला आहे. सध्या साकोली तालुका उष्णतेच्या तीव्र लाटांचा सामना करत असून एप्रिलमध्ये पारा ४२ अंशावर पोहोचलेला आहे. नदी आणि तलावांचा तालुका म्हणून ओळख असलेल्या साकोली तालुक्यात प्रखर उन्हामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. वनसंपदा आणि तलावांचा सम्राट असलेल्या साकोली तालुक्यात मात्र उन्हामुळे आणि पाण्याच्या समस्येमुळे नागरिकांचे हालहाल होत आहेत.एकेकाळी पाण्याची मुबलकता असलेला साकोली तालुका तथा साकोली सेंदुरवाफा नगर परिषद प्रभागातील नागरिक आज भीषण जल संकटाच्या छायेत सापडलेला आहे. चुलबंद नदीच्या तिरावर वसलेल्या साकोली सेंदूरवाफा शहराची लोकसंख्या २९,००० आहे. सध्या येथील नागरिकांना थेंब थेंब पाण्यासाठी दाही दिशा भटकावे लागत आहे. शहरातील विहिरी आणि कुपनलिका कोरड्या पडल्या असून संपूर्ण शहर आता टँकरच्या भरवशावर अवलंबून आहे. 
-
----------------------------------------------                 
            ३७ कोटीची पाणीपुरवठा योजना रखडली

सध्या साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद क्षेत्रातील पाणीपुरवठ्याची यंत्रणा सध्या कोलमडल्याचे चित्र आहे. शहरातील ३०० कुपनलिकांपैकी ७० कुपनलीका पूर्णपणे बंद पडलेल्या आहेत. तर उर्वरित कूप नलिकांचा जलस्तर वेगाने खाली जात आहे. शहरातील ४३ सार्वजनिक विहिरी कोरड्या पडल्या असून सौर उर्जेवर आधारित ४१ पाणी उपसा पंप आणि पाणी टाक्याही अपयशी ठरत आहेत. साकोली तालुक्यात एकोडी, खैरलांजी, गडकुंभली गोंडउमरी पळसगाव यासारख्या अनेक गावात नागरिकांनाच्या सुविधेसाठी उभारलेल्या गेलेल्या पाण्याच्या टाक्या अपयशी ठरल्यात. स्वतः साकोली-सेंदूरवाफाचा ग्रामपंचायत, नगरपंचायत आणि नगरपरिषद प्रवास झाला असतांना नागझिरा रोडवरील पाण्याची टाकी पांढरी हत्ती ठरली. सेंदुरवाफा श्रीनगर वसाहतीतील पाण्याची टाकी स्वतःच पाणी पाणी करत तहानलेली आहे. लाखांदूर रोडवर उभारण्यात येत असलेली पाण्याची टाकीचे काम कासव गतीने सुरू आहे. साकोली सेंदूरवाफा नगरपरिषद प्रभागातील पाणीपुरवठा करणारी ३७ कोटीची पाणीपुरवठा योजना निधी अभावी थंडबस्त्यात पडलेली आहे. गत अनेक वर्षापासून साकोली तालुका पाणीटंचाईसाठी बदनाम होता, प्रसिद्ध होता. आताही अशीच अवस्था तालुक्याची आणि साकोली सेंदुरवाफा नगर परिषदेची असेल तर याला खरच विकास झाला म्हणायचे काय ?
-----------------------------------------------

भूगर्भातील पाणी पातळी झपाट्याने खाली जात आहे.  कुपनलिका आणि विहिरी निकामी ठरत आहेत. माझ्या प्रभागातील नागरिक टँकरवर अवलंबून आहेत. आम्हाला अधिक टँकरची गरज आहे. शासनाने या समस्येचे गांभीर्य ओळखून विशेष निधी मंजूर करावा.

विवेक (सोनू ) बैरागी 
नगरसेवक प्रभाग ९
-----------------------------------------------

प्रभाग १० मध्ये जल स्तोत्राची संख्या अधिक आहे. त्यामूळे प्रभाग १० मधील नागरिकांना पाण्याच्या बाबतीत घाबरण्याची गरज नाही. वेळोवेळी पाणीपुरवठा केला जाईल. आपल्या समस्येला पूर्णपणे न्याय दिला जाईल. प्रभागातील नगरसेवकांचे जे कर्तव्य आहे ते पार पाडले जाईलच परंतु शासनाचेसुद्धा सहकार्य तितकेच आवश्यक आहे.

सपन कापगते, नगरसेवक.
स्मिता श्रीधर सीडाम, नगरसेविका.
प्रभाग १०

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या