जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन; कागदपत्रांच्या त्रासातून शेतकऱ्यांची सुटका
चित्रा न्युज प्रतिनिधी
चंद्रपूर : शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी होणारा कागदपत्रांचा विलंबाचा त्रास आता संपणार आहे. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पीक कर्ज वाटप प्रक्रिया पूर्णपणे डिजिटल करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. यासाठी बँकेने ‘कृषी 360’ ही अत्याधुनिक संगणकीय प्रणाली विकसित केली आहे.
या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा भव्य उद्घाटन सोहळा मंगळवार, 19 मे 2026 रोजी दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर येथील मुख्य कार्यालयातील मा. सा. कन्नमवार सभागृहात पार पडणार आहे. जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या शुभहस्ते या प्रणालीचे लोकार्पण होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे असतील.
आतापर्यंत शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी अनेक कागदपत्रे व विलंबाचा सामना करावा लागत होता. ‘कृषी 360’ प्रणालीमुळे अत्यंत सहज, जलद आणि पारदर्शक पद्धतीने शेतकऱ्यांना कर्ज उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकरी बांधवांची मोठ्या त्रासातून सुटका होईल.
या सोहळ्याला विशेष अतिथी म्हणून जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, नागपूर विभागीय सहनिबंधक प्रविण वानखेडे, जिल्हा उपनिबंधक जयसिंग ठाकूर आणि नाबार्डचे जिल्हा विकास व्यवस्थापक तृणाल फुलझेले उपस्थित राहणार आहेत.
सहकार आणि तंत्रज्ञानाचा हा सुवर्णसंगम पाहण्यासाठी शेतकरी बांधवांनी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे, मानद सचिव आवेशखान पठाण, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश्वर कल्याणकर आणि समस्त संचालक मंडळाने केले आहे.
-------------------------------------
चंद्रपूरच्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर! CDCC बँकेने आणली ‘कृषी 360’ डिजिटल प्रणाली. आता पीक कर्जासाठी कागदपत्रांचा त्रास नाही, विलंब नाही. 19 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते उद्घाटन. शेतकरी बांधवांनो, लाभ घ्या!


0 टिप्पण्या