बलात्कार व पोस्कोअंतर्गत गुन्ह्यातून महिनाभर पूर्वी आला होता जामिनावर !
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : साकोली शहरातील गडकुंभली रोड परिसरातील तलाव काठावर शुक्रवारी, २२ मे च्या सकाळी एका युवकाचा रक्तबंबाळ मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. निखिल राजकुमार कांबळे (वय ३० वर्षे, रा.मुरपार-लेंडेझरी, ता. सडक अर्जुनी, जि. गोंदिया) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. विशेष म्हणजे, बलात्कार व पोक्सोअंतर्गत गुन्ह्यातून महिनाभरापूर्वीच तो जामिनावर बाहेर आल्याची पोलिसांची माहिती आहे.
साकोली गडकुंभली रोड परिसरात सकाळी क्रिकेट खेळायला आलेल्या युवकांना हा मृतदेह दिसला. बाजुलाच त्याची मोटरसायकल (एमएच ४० के ५०९९) व बॅग अस्ताव्यस्त पडलेली आढळून आली. त्याच्या छातीवर, मानेवर व डोक्यावर धारदार शस्त्राने वार केल्याच्या गंभीर जखमा आढळल्या आहेत.
निखिल कांबळे हा मूळ सडक अर्जुनी तालुक्यातील रहिवासी असून, तो काही महिन्यांपासून साकोली येथे वास्तव्यास होता. स्थानिक पंचशील वार्डमध्ये भाड्याच्या खोलीत राहत असलेला निखिल साकोलीतील एका वाईन शॉपमध्ये सुमारे आठ हजार रुपये मासिक वेतनावर काम करीत होता.
२१ मे रोजी निखिल आपल्या मूळ गावी मुरपार-लेंडेझरी येथे गेला होता. कुटुंबीयांसोबत जेवण केल्यानंतर रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास तो मोटरसायकलने साकोलीकडे परतण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत पाण्याची रिकामी कॅन देखील असल्याची माहिती पुढे आली आहे. मात्र दुसऱ्या दिवशी सकाळी ६.००वाजताच्या सुमारास त्याचा मृतदेह तलाव परिसरात आढळल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. पूढील तपास सुरु आहे!


0 टिप्पण्या