Ticker

6/recent/ticker-posts

परवानगी नाकारली तर झाडे तोडूच कशी दिली ?

प्रकरण वन विभागाच्या अंगलट,आता मात्र सावरासावर 


 रवि भोंगाने चित्रा न्युज प्रतिनिधी 
साकोली:मौजा गिरोला येथे मालकी जागेतील कापलेल्या झाडाचे प्रकरण आता चांगलेच तापले असून परवानगी नाकारली तर झाडे तोडूच कशी दिली असा आरोप अर्जदार यांनी केला असून प्रकरण वन विभागाच्या अंगलट येत असल्याने आता मात्र या बसू, चर्चा करू असे सांगून सावरासावर करीत असल्याचा प्रकार समोर आलेला आहे. सविस्तर घटनाक्रम असा की, अर्जदार युवराज रामदास पर्वते रा. गिरोला यांनी गट क्रमांक १६० मधील झाडे तोडण्यास मनाई करावी म्हणून अर्जदाराने फेब्रुवारी २०२४ मध्येच कागदोपत्रे आक्षेप नोंदवला होता. तरीही कोणतीही तमा न बाळगता १० आणि ११ मे २०२६ रोजी कंत्राटदाराने या गटातील झाडांवर कुऱ्हाड चालवली. वृक्षतोड सुरू असताना अर्जदाराने १० मे रोजी लाखनीचे आर.एफ. ओ. आणि जांभळीचे क्षेत्र सहाय्यक अधिकारी यांना भ्रमणध्वनीवरून संपर्क साधून याची माहिती दिली. त्यानंतर १४ मे रोजी कंत्राटदाराविरुद्ध रीतसर लिखित तक्रारही दाखल करण्यात आली. मात्र तिथपर्यंत वनविभागाचे अधिकारी हेतू परस्पर झोपेत होते. या गंभीर तक्रारीकडे डोळे झाक करून वाटाण्याच्या अक्षदा लावल्यात. आता मात्र अर्जदार प्रसिद्धी माध्यमाच्या रूपातून न्याय मागणीसाठी समोर आल्याने लाखनी येथील वृक्ष अधिकारी तथा वनपरिक्षेत्र अधिकारी एन. धनविजय यांनी अर्जदाराला २०/५/२०२६ रोजी सागवान आणि आड जातीचे वृक्ष तोडीची परवानगी नाकारण्यात येत असल्याचे पत्र दिले. अर्जदारांनी जेव्हा वृक्ष तोडीची मंजुरी देऊ नये याकरिता अर्ज केला तेव्हा वनविगाने दखल घेतली नाही आणि कापून झाल्यानंतर आणि संजय बडवाईक कंत्राटदाराने सागवानचा असली माल लंपास केल्यानंतर मंजुरी नाकारण्यात येत आहे असा अफलातून प्रकार वनविभागाने समोर आणून स्वतःचेच हसे करून घेतले. मौजा गिरोला (  जपानी ) येथील गट नंबर १६० मधील सागवान व आडजात वृक्ष तोडल्याची तक्रार अर्जदार युवराज पर्वते यांनी पत्राद्वारे व स्वतः भेटून केली. असा आरोप अर्जदार यांनी प्रसिद्धी माध्यमात दिलेल्या तक्रारीत केला आहे. अर्जदार यांनी २२ मे २०२६ रोजी स्वतः डी. एफ. ओ. यांना भेटून संपूर्ण घटनाक्रम सांगितला. १५ मे २०२६ ला माहिती अधिकार अधिनियम २००५ अंतर्गत वृक्ष तोडीच्या प्रकरणात दाखल करण्यात आलेल्या सर्व कागद पत्रांच्या प्रती मागण्यात आल्या. आजतागत वनविभागाने कोणतीही माहिती दिली नाही. उलट २१ मे २०२६ ला व्हाट्सअपद्वारे वृक्ष तोडीचा परवाना नाकारत असल्याचे आर. एफ. ओ. धनविजय यांनी स्वतःच्या स्वाक्षरीसह अर्जदाराला पत्र दिले. परवानगी दिली नाही तर विना परवाना झाडे तोडलीच कशी असा प्रश्न या निमित्ताने निर्माण झालेला आहे. परवानगी जर नाकारली तर वृक्ष तोडणाऱ्यावर कारवाई का होऊ शकत नाही. मग वनविभागाचे अधिकारी गप्प का बसले आहेत. दोषींवर कार्यवाही का करत नाहीत असा प्रश्न अर्जदार यांनी उपस्थित केला आहे. अर्जदार यांनी आर. एफ. ओ. यांचे लाखनी कार्यालय व साकोली येथील आर. ओ मेश्राम यांचे कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र व्यवहार केला. दोन्ही अधिकारी यांनी पत्र घेण्यास नकार दिला. तसेच साकोली येथील ए.सी.एफ. यांनीही पत्र घेण्यास नकार दिला असे अर्जदाराने म्हटलेले आहे. डी. एफ. ओ. संबंधित प्रकरणातील लाकूड ठेकेदार संजय बडवाईक, आर.ओ., आर.एफ.ओ., फॉरेस्ट गार्ड या दोषींवर कारवाई न करता दोषींना जवळ करून प्रकरणावर पांघरूण घालण्याचे काम करीत आहेत असा आरोप अर्जदाराकडून करण्यात आलेला आहे. आर.एफ.ओ. एकीकडे अर्जदार यांना माहिती देतो म्हणून लाखनी येथील कार्यालयात बोलावतात आणि दुसरीकडे संबंधित बाबू भंडारा येथे गेले असल्याने माहिती देता येत नाही असे सांगतात. महिती द्यायची नव्हती तर बोलाविले कशाला असा सवाल अर्जदार यांनी केला आहे. मला न्याय मिळाला नाही तर सर्व कुटंबासह जांभळी सडक वनपरिक्षेत्र कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा अर्जदार यांनी दिला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या