Ticker

6/recent/ticker-posts

मनमाडमध्ये सार्वजनिक क्रीडांगण वाचवण्यासाठी वंचित बहुजन आघाडी आक्रमक

ठराव तात्काळ रद्द न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा


चित्रा न्युज प्रतिनिधी 
मनमाड : मनमाड नगरपरिषदेच्या सार्वजनिक क्रीडांगणाची जागा खाजगी व्यक्तीला टर्फ व्यवसायासाठी देण्याच्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडी, मनमाडच्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात नगरपरिषद प्रशासनाला निवेदन देत संबंधित ठराव तात्काळ रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, हे मैदान आणि गार्डन सर्वसामान्य नागरिकांच्या तसेच परिसरातील मुलांच्या खेळासाठी राखीव असून ते कोणत्याही खाजगी व्यावसायिक वापरासाठी देणे अन्यायकारक आहे. सार्वजनिक मालमत्तेवर जनतेचा हक्क अबाधित राहिला पाहिजे, अशी ठाम भूमिका संघटनेने मांडली.

निवेदनात नगरपरिषदेने क्रीडांगणाची जागा खाजगी व्यावसायिकांना देण्यासाठी मंजूर केलेला ठराव बेकायदेशीर असल्याचा आरोप करण्यात आला असून तो त्वरित रद्द करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

“आमच्या मुलांना खेळण्याचा हक्क आहे”, “गार्डन आमचा हक्काचा आहे, गार्डन वाचवा” अशा घोषणांद्वारे नागरिकांनी संताप व्यक्त केला. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी मैदान सर्वांसाठी खुले ठेवावे, अशी आग्रही मागणीही यावेळी करण्यात आली.

तसेच, संबंधित ठराव तातडीने रद्द करण्यात आला नाही तर जनतेचा हक्क हिरावून घेणाऱ्या निर्णयाविरोधात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष विलास आहिरे, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, सचिव कादिर शेख, ज्येष्ठ नेते दीपक बाबा साळवे, काकासाहेब भालेराव, अमोल केदारे, राजेंद्र संसारे, दीपक चव्हाण आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या