चित्रा न्युज प्रतिनिधी
मुरबाड :-मुरबाड बस आगारात रविवारी रात्री घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे संतापाची लाट उसळली आहे. कल्याण बसची विचारणा करणाऱ्या एका अल्पवयीन प्रवासी मुलाला एसटी कर्मचाऱ्याने मारहाण केल्याची घटना समोर आली असून, या प्रकरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संबंधित कर्मचाऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री साडेदहाच्या सुमारास मुरबाड बस आगारात दत्ता भालेराव या एसटी कर्मचाऱ्याने कथितपणे मद्यधुंद अवस्थेत मुलाला कानाखाली मारत बेदम मारहाण केली. मुलाचा दोष एवढाच की, त्याने कल्याणकडे जाणाऱ्या बसची विचारणा केली होती.
घटनेनंतर उपस्थित नागरिकांनी संताप व्यक्त केला. स्थानिक वकील प्रफुल्ल रोकडे यांनी तात्काळ हस्तक्षेप करत मुलाची सुटका केली तसेच संबंधित प्रकाराविरोधात आवाज उठवला. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल होताच नागरिकांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या.
सार्वजनिक रोष वाढल्यानंतर मुरबाड आगार प्रशासनाने तातडीने कारवाई करत संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित केले आहे.
दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले असून, मुरबाड आगारातील अनियमित बसफेऱ्या, कर्मचाऱ्यांची अरेरावी आणि प्रवाशांच्या वाढत्या तक्रारींबाबतही नागरिकांनी कठोर कारवाईची मागणी केली आहे.


0 टिप्पण्या