गप्पी मासे सोडण्याचा विशेष उपक्रम राबविण्यात आला
चित्रा न्युज प्रतिनिधी
निलंगा : आयुष्मान आरोग्य मंदिर उपकेंद्र कोकळगाव येथे डेंग्यू दिनाच्या निमित्ताने गावातील नागरिकांना डेंग्यू आजाराची माहिती देऊन पत्रक वाटप करण्यात आले व सर्व नागरिकांना आरोग्य शिक्षण देण्यात आले. तसेच डेंग्यू हा डासांपासून होणारा हा एक विषाणूजन्य आजार आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळण्याचे आवाहन गावातील नागरिकांना करण्यात आले.
” डेंग्यू ” हा अतिशय गंभीर आजार आहे. दरवर्षी 16 मे हा दिवस ” राष्ट्रीय डेंग्यू दिवस ” म्हणून साजरा केला जातो. हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश लोकांना डेंग्यू आजाराबद्दल माहिती व जनजागृती करणे हा आहे. तसेच गप्पी मासे हे डासांची आळी कशी खातात याबद्दलही माहिती दिली. गप्पी माशांमुळे डासांची घनता कशी कमी होते हे प्रात्यक्षिकाद्वारे गावातील नागरिकांना दाखवण्यात आले. गप्पी मासे कायमस्वरूपी व तात्पुरत्या डासोत्पत्ती स्थानामध्ये सोडल्यास डासांची निर्मिती नियंत्रणात राहते. सन 2026 या वर्षीचे घोष वाक्य Community Participation Dengue Control: Check, Clean and Cover हे आहे. त्याचे मराठी भाषांतर " डेंग्यु नियंत्रणासाठी लोकसहभाग साठवलेल्या पाणीसाठ्यांची तपासणी करा, स्वच्छता राखा आणि ती भांडी झाकून ठेवा " असे आहे.
डेंग्यू ताप हा विशिष्ट विषाणुमुळे होतो. डेंग्यूचा प्रसार हा ” एडिस इजिप्टाय ” नावाच्या डासामुळे होतो. या डासाची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते. कोणतेही पाणी 8 दिवसापेक्षा जास्त दिवस साठवून ठेवल्यास त्यामध्ये डास अंडी घालतात. त्यानंतर अंड्याचे रुपांतर आळीत व त्यानंतर डास तयार होतात. कोणतेही साठविलेले पाणी हे आठ दिवसांपेक्षा जास्त साठवून ठेवू नये. याबाबत नागरिकांनी खबरदारी घेणे आवश्यक असून डासाची उत्पत्ती कमी करुन नियंत्रणात ठेवण्यासाठी आरोग्य यंत्रणेला जनतेचे सहकार्य आवश्यक आहे असे आवाहन करून नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. राष्ट्रीय डेंग्यू दिन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.संजय पवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रदीपकुमार जाधव व मदनसुरी प्रा.आ.केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.स्नेहा मुळजे, डॉ.शितल साळुंके, आरोग्य निरीक्षक ओमप्रकाश भोजने, जी.जी. गिरी प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी जयप्रकाश सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा करण्यात आला. राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्यासाठी आरोग्य कर्मचारी राहुल भोसले, आरोग्यसेविका सी.के.जाधव, परिचारिका कमलबाई सूर्यवंशी यांनी परिश्रम घेतले.


0 टिप्पण्या