Ticker

6/recent/ticker-posts

भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघात 100% टक्के मतदान

◾४५७ पैकी सर्व ४५७ मतदारांनी बजावला हक्क
◾मतपेट्या वैनगंगा स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित
◾२२ जून रोजी सकाळी ८ वाजता मतमोजणी

चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंडारा, / गोंदिया  :  महाराष्ट्र विधान परिषदेच्या भंडारा-गोंदिया स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक-२०२६ साठी गुरुवारी झालेल्या मतदानात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांतील चार मतदान केंद्रांवर शांततेत पार पडलेल्या मतदानात एकूण ४५७ पैकी सर्व ४५७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत  100%  टक्के मतदानाची नोंद केली. मतदानानंतर मतपेट्या वैनगंगा स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या असून २२ जून रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.

जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सावन कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान प्रक्रिया सकाळी ८ ते दुपारी ४ वाजेदरम्यान पार पडली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांसाठी आयोजित या निवडणुकीत सर्वच मतदारांनी सहभाग नोंदविल्याने प्रशासनाने समाधान व्यक्त केले आहे.

मतदान केंद्रनिहाय आकडेवारीनुसार, उपविभागीय अधिकारी कार्यालय, भंडारा येथे १६६ पैकी १६६ मतदारांनी मतदान केले. उपविभागीय अधिकारी कार्यालय, साकोली येथे ६१ पैकी ६१ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. जिल्हाधिकारी कार्यालय, गोंदिया येथे १५४ पैकी १५४ मतदारांनी मतदान केले, तर तहसील कार्यालय, अर्जुनी मोरगाव येथे ७६ पैकी ७६ मतदारांनी मतदान केले.

एकूण मतदानामध्ये २२४ पुरुष आणि २३३ महिला मतदारांचा समावेश असून सर्व केंद्रांवर शंभर टक्के मतदान झाले. मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मतपेट्या कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत वैनगंगा स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत.

स्ट्राँग रूमच्या सुरक्षेसाठी नायब तहसीलदारांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तैनात करण्यात आले असून उमेदवार अथवा त्यांचे अधिकृत प्रतिनिधी इच्छेनुसार स्ट्राँग रूम परिसरात येऊन पाहणी करू शकणार आहेत. निवडणूक प्रशासनाने पारदर्शकता आणि सुरक्षेला प्राधान्य देत आवश्यक सर्व व्यवस्था केली आहे.
दरम्यान, या निवडणुकीची मतमोजणी २२ जून रोजी पोलीस बहुउद्देशीय सभागृह येथे सकाळी ८ वाजल्यापासून सुरू होईल.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या