पत्रकारांना विमा कार्डचे वितरण होणार -
जिल्हाध्यक्ष शशीकांत भोयर यांचे मार्गदर्शन
चित्रा न्युज प्रतिनिधी
भंडारा : व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल, भंडारा जिल्हा वतीने ( बुध. १० जून ) ला ऑफिसर क्लब भंडारा येथे "नोंदणी अभियान" सभेचे आयोजन करण्यात आले. दु. १२ वाजता सुरू झालेल्या या सभेत जिल्ह्यातील पत्रकारांसाठी इन्शुरन्स कार्ड वितरण व नोंदणी अभियान अंतर्गत फॉर्म भरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झाली आणि यामध्ये तब्बल ८७ पत्रकारांनी विक्रमी नोंदणी केली.
सभेच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे भंडारा जिल्हाध्यक्ष शशीकांत भोयर होते. यावेळी भंडारा शहर अध्यक्ष काशिनाथ ढोमणे, पवनी तालुकाध्यक्ष विशाल रणदिवे, लाखनी तालुकाध्यक्ष कल्याण राऊत, साकोली तालुकाध्यक्ष आशिष चेडगे यांच्यासह जिल्ह्यातील मोठ्या संख्येने जिल्हा, तालुका व शहर कार्यकारिणीतील पत्रकार सदस्य बांधव उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष शशीकांत भोयर यांनी उपस्थित पत्रकारांना संघटनेतर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. पत्रकारांच्या सामाजिक सुरक्षेसाठी इन्शुरन्स योजना अत्यंत महत्त्वाची असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक पत्रकाराने नोंदणी करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
नोंदणी अभियानांतर्गत जिल्ह्यातील सर्व पत्रकारांची माहिती संकलित करून त्यांना ओळखपत्र व इन्शुरन्स कार्ड उपलब्ध करून दिले जाणार आहे. यामुळे आपत्कालीन परिस्थितीत पत्रकारांना आर्थिक मदत मिळणे सोपे होणार आहे. फॉर्म भरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू झाली असून तालुका स्तरावरही लवकरच अभियान राबवले जाणार आहे. यावेळी तालुकाध्यक्षांनीही आपल्या तालुक्यातील पत्रकारांच्या समस्या मांडल्या. संघटितपणे काम केल्यास पत्रकारांचे प्रश्न सोडवणे सोपे होईल, पत्रकारितेतील जोखीम लक्षात घेता इन्शुरन्स कवच आवश्यक असल्याचे मत उपस्थितांनी मांडले.
व्हॉईस ऑफ मीडिया इंटरनॅशनल ही देशात ३ लाख ४० हजार पत्रकार सदस्य असलेली पत्रकारांच्या हक्कांसाठी व सुरक्षेसाठी काम करणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. भंडारा जिल्ह्यात संघटना अधिक बळकट करण्यासाठी नोंदणी अभियान हाती घेण्यात आले आहे. सभेला जिल्हाभरातून ८७ पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. याप्रसंगी जिल्हा अध्यक्ष शशिकांत भोयर यांनी जिल्ह्यातील एकमेव महिला पत्रकार साकोलीच्या मनिषा काशिवार यांचे सहर्ष स्वागत केले.


0 टिप्पण्या