Ticker

6/recent/ticker-posts

सावध व्हा !!! गरमागरम वडापाव किंवा भजी खाताना 'ही' चूक करताय?


⭕ जिभेचे चोचले पुरविण्यासाठी  आपल्या कुटुंबाचा बळी घेऊ नका. 

⭕ वर्तमानपत्रात गुंडाळले पदार्थ स्लो पायझनिंग असु शकते? 

⭕ डॉ. संयुक्ता निमजे  यांनी व्यक्त केले मत. 

चित्रा न्युज प्रतिनिधी 
नागपूर:-आजच्या आधुनिक काळात दिवसेंदिवस आळशीपणा वाढल्याने आपले आणि परिवारातील लहान..मोठ्यांच्या  जिभेचे चोचले पुरविण्यासाठी लहान- मोठ्या हाॅटेलमध्ये, फुटपाथवर उपलब्ध असलेल्या गरमागरम वडापाव, भजी, पोहे किंवा उपीट खाण्याची एक वेगळीच मजा घेत असतो. घराबाहेर पडलं की रस्त्यावर असलेल्या गाड्यांवर किंवा हॉटेल्समध्ये हे पदार्थ आपल्याला अनेकदा वर्तमानपत्रात  गुंडाळून दिले जातात. अगदी घरातही कित्येक माता-भगिनी भजी किंवा पुरी तळल्यानंतर, त्याचे जास्तीचे तेल शोषून घेण्यासाठी ते वर्तमानपत्रावर काढतात.आपल्याला वाटते की यामुळे तेल कमी होऊन पदार्थ सुका होईल आणि सोयीचे पडेल. पण हे एक 'स्लो पॉयझनिंग' (Slow Poisoning) करणारी सवय आहे! वर्तमानपत्राचा वापर घातक का आहे?  याबाबत नागरिकांनी जागरूक होणे गरजेचे आहे असे मत डॉ. संयुक्ता निमजे यांनी व्यक्त केले. रासायनिक शाईचा थेट पोटात प्रवेश झाला तर जिवितहानी फार मोठ्या प्रमाणात होऊ शकते . 
वर्तमानपत्र छापण्यासाठी जी शाई (Ink) वापरली जाते, ती सामान्य नसते. त्यामध्ये 'लेड' (शिसे), 'कॅडमियम' आणि 'ग्रेफाइट' यांसारखे जड आणि विषारी धातू असतात. जेव्हा अत्यंत गरम किंवा तेलकट पदार्थ या पेपरवर ठेवले जातात, तेव्हा उष्णतेमुळे ही शाई विरघळते आणि अन्नामध्ये पूर्णपणे शोषली जाते. जेव्हा ते अन्न खातो, तेव्हा ही घातक रसायने थेट आपल्या शरीरात जातात. आणि कॅन्सर (कर्करोग) सारख्या गंभीर आजारांना आमंत्रण दिले जाऊ शकते. या शाईमध्ये 'डायब्युटाइल फटालेट' आणि 'आइसोब्युटाइल फटालेट' सारखे अत्यंत धोकादायक सॉल्व्हेंट्स असतात. हे घटक शरीरात गेल्यास पचनसंस्थेचे गंभीर आजार होतात. वैद्यकीय संशोधनानुसार, दीर्घकाळ अशा शाईच्या संपर्कात आलेले अन्न खाल्ल्याने पोटाचाआणि फुफ्फुसाचा कॅन्सर होण्याचा धोका कित्येक पटीने वाढू शकतो. ईतकेच नव्हे तर 
 शरीरातील महत्त्वाचे अवयव निकामी होण्याचा धोका नाकारता येणार नाही.  शाईमधील 'लेड' (शिसे) हा घटक आपल्या रक्तामध्ये मिसळतो. यामुळे आपली नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती अत्यंत कमकुवत होते. शरीराची गाळण प्रक्रिया सांभाळणारे यकृत आणि किडनी (मूत्रपिंड) यांच्या कार्यावर अत्यंत वाईट परिणाम होतो. लहान मुले, गरोदर महिला आणि वृद्धांसाठी तर हे विष ठरू शकते. असे मतही डॉ. संयुक्ता निमजे यांनी व्यक्त केले आहे.
रिसायकलिंग आणि घातक प्रक्रियेचा कचरा जमा करून अनेक प्रकारच्या प्रक्रिया केल्या जातात. वर्तमानपत्र बनवण्यासाठी अनेकदा जुन्या, रद्दी कागदांचा पुनर्वापर (Recycle) केला जातो. हा कागद पांढरा आणि मऊ करण्यासाठी त्यावर विविध प्रकारची घातक ब्लीचिंग रसायने वापरली जातात. ही रासायनिक प्रक्रिया अन्नाचा दर्जा पूर्णपणे खराब करते. लाखो हातांमधून आलेले बॅक्टेरिया (Infection):
वर्तमानपत्र छापखान्यातून निघाल्यापासून ते वाहतूकदार, पेपर टाकणारा मुलगा आणि रद्दी गोळा करणारे अशा हजारो हातांमधून प्रवास करत आपल्या अनेक घरापर्यंत पोहोचते. या प्रवासात त्यावर कोट्यवधी डोळ्यांना न दिसणारे हानिकारक जिवाणू (Bacteria), बुरशी आणि धूळ जमा होते. अशा कागदावर अन्न ठेवणे म्हणजे संसर्गाला थेट आमंत्रण देणे होय. हे नाकारता येणार नाही. घरामध्ये तळलेले पदार्थ सुकवण्यासाठी किंवा तेल शोषण्यासाठी वर्तमानपत्राऐवजी नेहमी 'किचन टिश्यू पेपर' या स्वच्छ पांढऱ्या सुती कपड्याचा वापर करावा. बाहेर जाताना / डबा देताना अन्नपदार्थ पॅक करण्यासाठी 'बटर पेपर' किंवा अ‍ॅल्युमिनियम फॉइलचा वापर करावा. त्याहीपेक्षा सर्वात उत्तम म्हणजे स्वतःचा स्टीलचा डबा सोबत ठेवल्यास खुप योग्य होऊ शकते. सद्यस्थितीत अशा विक्रेत्यांचे प्रबोधन करण्यात आले तर आरोग्य चांगले होण्यास मदत होऊ शकते. परिसरातील वडापाव किंवा भजी विक्रेते जर अजूनही वर्तमानपत्र वापरत असतील, तर त्यांना या धोक्यांची जाणीव करून द्या.  या गंभीर बाबींकडे संबंधित प्रशासकीय  यंत्रणेने पराकोटीचे लक्ष दिले पाहिजे. टिश्यूपेपर, द्रोण, पात्राडीच्या झाडांची पानं किंवा केळीच्या पानांचा वापर करण्याचा आग्रह करण्याची गरज आहे. "जिभेचे चोचले पुरवताना किंवा केवळ सोयीसाठी  आपल्या कुटुंबाच्या आरोग्याचा बळी देऊ शकत नाही.  त्यासाठी प्रत्येकांनी जागरूक नागरिक व्हावे आणि आपल्या परिवारासह सर्वांच्या आरोग्याला प्राधान्य द्यावे असे मत डॉ. संयुक्ता निमजे यांनी व्यक्त केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या