'पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षेसाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी' – व्हॉईस ऑफ मीडिया पवनी
चित्रा न्युज प्रतिनिधी
पवनी :शिवसेना (शिंदे गट) चे खासदार संजय दिना पाटील यांनी वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांबाबत कथितरीत्या केलेल्या अपमानास्पद वक्तव्याचा तसेच पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीसदृश भाषेचा व्हॉईस ऑफ मीडिया, भंडारा जिल्ह्यातील पवनी शाखेने तीव्र निषेध केला आहे. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पवनी पोलीस स्टेशनमार्फत ठाणेदार. निवेदन सादर करून संबंधित प्रकरणात तात्काळ कारवाईची मागणी करण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांशी लोकप्रतिनिधींनी अपमानास्पद वर्तन करणे ही अत्यंत गंभीर बाब असून, त्यामुळे मुक्त पत्रकारिता व लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचतो. पत्रकार हे शासन व जनतेमधील महत्त्वाचा दुवा असून, जनतेच्या समस्या शासनापर्यंत पोहोचविण्याचे संवैधानिक कर्तव्य ते बजावत असतात. अशा परिस्थितीत पत्रकारांचा अवमान होणे हे निषेधार्ह असल्याचे संघटनेने नमूद केले आहे.
व्हॉईस ऑफ मीडियाने शासनाकडे तीन प्रमुख मागण्या केल्या आहेत. खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या कथित वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन योग्य कारवाई करावी, पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षेसाठी कठोर भूमिका घ्यावी आणि महाराष्ट्रात पत्रकारांना निर्भय व सन्मानाने काम करता येईल असे वातावरण निर्माण करावे.
हे निवेदन व्हॉईस ऑफ मीडिया भंडारा जिल्हाध्यक्ष शशिकांत भोयर यांच्या नेतृत्वाखाली सादर करण्यात आले. यावेळी मार्गदर्शक हरिचंद भाजीपाले मनोज चिचघरे (भंडारा जिल्हा सचिव), शेखर जिभकाटे (पवनी शहर अध्यक्ष) पत्रकारांची नावे पूर्ण यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
"पत्रकारांचा सन्मान अबाधित ठेवा; लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावरील हल्ले सहन केले जाणार नाहीत," असा इशाराही व्हॉईस ऑफ मीडियाने निवेदनाद्वारे दिला आहे.


0 टिप्पण्या