Ticker

6/recent/ticker-posts

खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याचा तुमसरात तीव्र निषेध



व्हॉईस ऑफ मीडिया’ आक्रमक: मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे कारवाईची मागणी

पत्रकारांचा अवमान भोवणार

चित्रा न्युज प्रतिनिधी 
​तुमसर :  लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांविरुद्ध शिवसेनेचे (शिंदे गट) खासदार संजय दिना पाटील यांनी केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचे आणि धमकीसदृश भाषेचे पडसाद भंडारा जिल्ह्यात उमटले आहेत. या प्रकरणाचा ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या तुमसर शाखेने तीव्र शब्दांत निषेध नोंदवत, संबंधित खासदारावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात तुमसर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुभाष बारसे यांच्यामार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
*​पत्रकारिता दबावाखाली?*
               निवेदनात नमूद केल्यानुसार, वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांबाबत लोकप्रतिनिधींकडून होणारी अशी अभद्र भाषा केवळ पत्रकारांचाच नव्हे, तर लोकशाही मूल्यांचा अपमान आहे. पत्रकार हे शासन आणि जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करत असताना, त्यांनाच धमकावणे किंवा त्यांचा अवमान करणे ही गंभीर बाब असल्याचे संघटनेने म्हटले आहे. “लोकशाहीच्या चौथ्या स्तंभावर होणारे हल्ले खपवून घेतले जाणार नाहीत,” असा इशाराही यावेळी देण्यात आला.
*​शासनाकडे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या तीन प्रमुख मागण्या:*
१. खासदार संजय दिना पाटील यांच्या वक्तव्याची तात्काळ दखल घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.
२. राज्यातील पत्रकारांच्या सन्मान व सुरक्षेसाठी शासनाने ठोस आणि कठोर धोरण अवलंबावे.
३. पत्रकारांना भयमुक्त वातावरणात आपले कर्तव्य पार पाडता येईल, अशी यंत्रणा निर्माण करावी.
​        निवेदन सादर करताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे भंडारा जिल्हा कार्यकारिणी सदस्य राहुल डोंगरे, तालुकाध्यक्ष अनिल कारेमोरे यांच्यासह देवचंद टेंभरे, राहुल भुतांगे, रोहित बोंबर्डे, हर्षल खडसे, अमृतलाल चरडे, सिताराम जोशी, जीवन वनवे, संजय नेमाडे, धनंजय बडवाईक, तुषार पशिने, संजय बडवाईक आदी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
​या घटनेमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या