खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांचा केला अवमान • "व्हॉईस ऑफ मीडिया" साकोली तर्फे मुख्यमंत्र्यांना निवेदन
चित्रा न्युज प्रतिनिधी
साकोली: पाच दिवसांपूर्वी शनिवार २० जूनला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी "पत्रकारांना धमकी द्याल तर थेट जेलची हवा खाल, व पत्रकारांना धमकी म्हणजे थेट लोकशाहीला आव्हान असून दोषींना कोणतीही माफी नाही" असे रोखठोक आवाहन केले. हे झाले असतानाच परवा शिवसेना ( शिंदे ) गटाचे खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या अपमानास्पद वक्तव्यावर महाराष्ट्रातील समस्त पत्रकार आक्रमक झाले. याचा निषेध व त्यांवर कारवाई करण्यासाठी काल ( शुक्र. २६ जून ) ला साकोलीत व्हॉईस ऑफ मीडियाच्या पत्रकारांनी काळ्या फिती लावून निषेध नोंदविला. व मुख्यमंत्री यांना पोलीस निरीक्षक यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले आहे. या वक्तव्यावर साकोली तालुका पत्रकार संघाने सुद्धा निषेध नोंदविला.
साकोली तालुका व्हॉईस ऑफ मीडिया कडून शुक्रवारी सर्व पत्रकारांनी काळ्या फिती लावून पोलीस ठाणे परीसरात "खासदार संजय दिना पाटील यांचा निषेध असो, पत्रकारांचा अपमान व्हॉईस ऑफ मीडिया सहन करणार नाही" अश्या घोषणा दिल्या. व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देण्यात आले. यात नमूद की, शिवसेना ( शिंदे गट ) खासदार संजय दिना पाटील यांनी बातमी संकलनासाठी गेलेल्या पत्रकाराबाबत केलेल्या कथित अपमानास्पद वक्तव्याचा व पत्रकारांना जीवे मारण्याच्या धमकीचा व अश्लील शिव्यागाळीचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारांना लोकप्रतिनिधींकडून अशा प्रकारची अपमानास्पद वागणूक मिळणे ही अत्यंत गंभीर आणि लोकशाही मूल्यांना हरताळ फासणारी बाब आहे. पत्रकार हे शासन आणि जनता यांच्यातील महत्त्वाचा दुवा असून, निर्भयपणे प्रश्न विचारणे आणि जनतेच्या समस्या मांडणे हे त्यांचे घटनात्मक कर्तव्य आहे. लोकप्रतिनिधींकडून पत्रकारांचा अवमान होणे, हे मुक्त पत्रकारितेच्या वातावरणासाठी अत्यंत घातक आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व पत्रकारांच्या भावना तीव्र असून, आम्हाला प्रशासनाकडून खालीलप्रमाणे कार्यवाही अपेक्षित आहे.
खासदार संजय दिना पाटील यांनी पत्रकारांबाबत केलेल्या विधानाची आपण तात्काळ दखल घ्यावी. पत्रकारांचा सन्मान व त्यांची सुरक्षा अबाधित राहील, यासाठी शासनाने कठोर भूमिका घ्यावी. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्यात पत्रकारांना सन्मानाने काम करण्याचे वातावरण मिळावे, ही आमची रास्त अपेक्षा आहे. याप्रकारे निवेदन देण्यात आले. याप्रसंगी व्हॉईस ऑफ मीडिया साकोली तालुका अध्यक्ष आशिष चेडगे, जिल्हा कार्यकारिणीचे डी. जी. रंगारी, उपाध्यक्ष रवि भोंगाणे, कोषाध्यक्ष मनिषा काशिवार, सचिव किशोर रंगारी, किशोर बावणे, ऋग्वेद येवले, यशवंत कापगते, शितल नागदेवे, निलय झोडे हे प्रामुख्याने पोलीस ठाणे येथे उपस्थित होते.


0 टिप्पण्या