Ticker

6/recent/ticker-posts

मका खरेदीचा खोळंबा : कुंभली येथे २ किमी लांब रांगा; ९ दिवसांपासून बळीराजा रस्त्यावर

खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांची पाहणी; गोडाऊनची संख्या वाढवून खरेदीला गती देण्याची मागणी


चित्रा न्युज प्रतिनिधी 
भंंडारा :-साकोली तालुक्यातील कुंभली येथील शासकीय मका खरेदी केंद्रावरील ढिसाळ व्यवस्थापनामुळे शेतकऱ्यांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. गेल्या नऊ दिवसांपासून शेतकरी आपल्या वाहनांसह रस्त्यावर ताटकळत उभे असून खरेदी केंद्राबाहेर तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. या गंभीर परिस्थितीची दखल घेत भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली व शेतकऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.
खरेदी केंद्रावर मोजमापाची प्रक्रिया अत्यंत संथ गतीने सुरू असल्याने शेतकऱ्यांचा संताप वाढत आहे. काही शेतकऱ्यांनी जवळच्या परिसरातील लोकांच्या मक्याचे मोजमाप प्राधान्याने होत असल्याची तक्रारही खासदारांसमोर मांडली. कडक उन्हात दिवस-रात्र रस्त्यावर थांबूनही मका विक्री होत नसल्याने शेतकरी आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहेत.
खरेदी केंद्रावर पिण्याच्या पाण्याची तसेच सावलीची कोणतीही पुरेशी व्यवस्था नसल्याने शेतकऱ्यांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. त्यातच अवकाळी पावसाची शक्यता निर्माण झाल्याने उघड्यावर ठेवलेला लाखो रुपयांचा मका भिजून नुकसान होण्याची भीती शेतकरी व्यक्त करीत आहेत.
परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन खासदार डॉ. प्रशांत पडोळे यांनी प्रशासनाला तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. बंद असलेली सरकारी गोडाऊने त्वरित सुरू करावीत, गोडाऊनची संख्या वाढवावी तसेच मका खरेदी व मोजमाप प्रक्रियेला गती देऊन शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी भंडारा तसेच संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. शेतकऱ्यांचे हाल तात्काळ थांबले नाहीत तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
या पाहणीदरम्यान परिसरातील मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आता प्रशासन या गंभीर समस्येवर कितपत तत्परतेने कार्यवाही करते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या