बनावट बियाणे पुरवठ्याप्रकरणी पुरवठादार व कंपनीवर गुन्हा
प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती :तालुक्यातील कान्सा व शिरपूर येथील 17 शेतकऱ्यांच्या शेतात सोयाबीनची पेरणी करूनही उगवण न झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांनी याबत तालुका कृषी कार्यालयाकडे लेखी तक्रार केली होती.
तक्रारीनंतर कृषी विभागाच्या पथकाने संबंधित शेतांची पाहणी करून पंचनामा केला. तसेच तपासणीसाठी बियाण्याचे 5 नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. त्यापैकी एक नमुना बनावट असल्याचे प्रयोगशाळेच्या अहवालातून स्पष्ट झाले.
या अहवालाच्या आधारे कृषी विभागाचे गुणनियंत्रक निरीक्षक यांनी गुरुवारी (दि. 23) भद्रावती पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार बियाणे पुरवठादार राहुल रामराऊ उर्मी, रा. संभाजी नगर तसेच बुस्टर प्लॅन्ट जेनेरिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या संपूर्ण प्रकरणामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बनावट बियाण्यामुळे केवळ पेरणीच वाया गेली नाही तर खत, औषध आणि मजुरीचाही खर्च पाण्यात गेला आहे.
या प्रकरणाबत अधिक माहिती घेण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी माहिती देणे टाळले.
सध्या या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत. बनावट बियाणे विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.


0 टिप्पण्या