चित्रा न्युज प्रतिनिधी
पोहरा :- लाखनी तालुक्यातील प्रमुख मार्ग असलेल्या पोहरा ते पालांदूर या मार्गावरील राज्य परिवहन मंडळाची (एसटी) बस सेवा गेल्या काही दिवसांपासून पूर्णपणे बंद आहे. मानेगाव येथील अंडरपास रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने प्रशासनाने ही बस सेवा तात्पुरती बंद केली खरी, परंतु यामुळे या भागातील हजारो नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. ही बंद पडलेली बस सेवा तातडीने पूर्ववत सुरू करण्यात यावी, अशी आक्रमक मागणी पोहरा व परिसरातील गावांमधील नागरिकांनी केली आहे.
प्रवाशांची कोंडी
पोहरा हे परिसरातील एक मुख्य केंद्र असून, या मार्गावरून दररोज शेकडो विद्यार्थी, नोकरदार, शेतकरी आणि रुग्ण ये-जा करत असतात. मानेगाव जवळ सुरू असलेल्या अंडरपासच्या कामाचे कारण पुढे करत बस फेऱ्या अचानक बंद करण्यात आल्या. त्यामुळे पोहरा, पेंढरी, कनेरी, गुरुढा, गोंडेगाव आणि पालांदूर या ग्रामीण भागातील दळणवळण व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे.
पर्यायी वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने प्रवाशांना जाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तर रुग्णांना दवाखान्यात पोहोचण्यासाठी खाजगी वाहनांचा महागडा आसरा घ्यावा लागत आहे. खाजगी वाहनचालक या परिस्थितीचा फायदा घेत प्रवाशांची आर्थिक लूट करत असल्याचा आरोपही ग्रामस्थांनी केला आहे.
लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाला साकडे
अंडरपासचे काम आवश्यक असले, तरी त्यासाठी ग्रामीण भागाची हक्काची जीवनवाहिनी असलेली एसटी बस सेवा पूर्णपणे बंद करणे अन्यायकारक आहे, अशी भावना नागरिकांमध्ये आहे. रस्त्याचे काम सुरू असतानाही एसटी बससाठी पर्यायी मार्ग काढणे शक्य आहे, मात्र प्रशासनाच्या उदासीनतेमुळे प्रवासी वेठीस धरले गेले आहेत.
पोहरा, पेंढरी, कनेरी, गुरुढा, गोंडेगाव व पालांदूर येथील संतप्त नागरिकांनी प्रशासनाला चेतावणी दिली आहे की, जर येत्या काही दिवसांत ही बस सेवा पूर्ववत सुरू झाली नाही, तर परिसरातील सर्व ग्रामस्थ मिळून तीव्र आंदोलन छेडतील. आता एसटी महामंडळ आणि संबंधित प्रशासन यावर काय तोडगा काढते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
"बस सेवा बंद झाल्यामुळे आमचे आणि मुलांच्या शिक्षणाचे प्रचंड नुकसान होत आहे. प्रशासनाने यावर त्वरित तोडगा काढून पर्यायी मार्गाने का होईना, पण बस सेवा सुरू करावी."
— स्थानिक नागरिक, पोहरा परिसर.


0 टिप्पण्या