Ticker

6/recent/ticker-posts

वरोरा पोलिसांची मोठी कारवाई, मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा पर्दाफाश; 3 आरोपी अटक, 13 बाईक जप्त


चित्रा न्युज प्रतिनिधी 
वरोरा :- वरोरा शहरात गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या मोटारसायकल चोरीच्या मालिकेचा वरोरा पोलिसांनी अखेर पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी 3 आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून चोरीच्या 13 मोटारसायकली आणि बनावट आरसी कागदपत्रे असा एकूण 6 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे हेमंत विनोद चौधरी रा. शिंगोव गोटमाडी, ता. समुद्रपूर जि. वर्धा, सुरज एकनाथ उमरे रा. दहेगाव, ता. वरोरा आणि प्रमोद रामकृष्ण हेपट रा. खांजी वॉर्ड, वरोरा अशी आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 4 जुलै 2026 रोजी वैष्णोनगर, वरोरा येथील रहिवासी अमोल दयाराम भोग 32 वर्ष यांची MH-34 BK-5527 क्रमांकाची सुमारे 40 हजार रुपये किमतीची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी लंपास केली होती. 

या प्रकरणी वरोरा पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 789/2026 भा.न्य.सं. 2023 चे कलम 303(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वीही शहरात मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्याने पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली.

गुन्हा दाखल होताच पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के यांनी विशेष तपास पथकाला तपासाचे आदेश दिले. सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने शहरातील सुमारे 50 सीसीटीव्ही तसेच नागपूर–चंद्रपूर महामार्गावरील 70 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे दोन मुख्य आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

कसून चौकशीदरम्यान आरोपींनी वरोरा शहरातून 11 मोटारसायकली चोरी केल्याची कबुली दिली. चोरी केलेल्या बाईक विक्रीसाठी वर्धा जिल्ह्यात पाठविल्याचेही त्यांनी सांगितले. 

पुढील तपासात प्रमोद रामकृष्ण हेपट हा चोरीच्या वाहनांसाठी बनावट आरसी तयार करून देत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून दोन मोटारसायकली आणि बनावट आरसी कागदपत्रे जप्त करण्यात आली.

या संपूर्ण कारवाईत पोलिसांनी एकूण 13 मोटारसायकली जप्त केल्या. या यशस्वी कारवाईमुळे वरोरा शहरातील मोटारसायकल चोरीच्या अनेक गुन्ह्यांचा उलगडा झाला असून आणखी काही गुन्ह्यांचा तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अप्पर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक ओमप्रकाश सोनटक्के, सहायक पोलीस निरीक्षक शरद भस्मे तसेच वरोरा पोलीस ठाण्यातील विशेष तपास पथकाने पार पाडली. पुढील तपास वरोरा पोलीस करत आहेत.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या