Ticker

6/recent/ticker-posts

स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त सेवा, संस्कार आणि समाजजागृतीचा संगम

 वार्षिकांक ‘विवेक’चे प्रकाशन; वृक्षारोपण व रक्तदान शिबिराने जयंतीला सामाजिक बांधिलकीची दिशा

भद्रावती प्रतिनिधी : राजेश येसेकर 


भद्रावती : स्थानिक विवेकानंद महाविद्यालयात विवेकानंद ज्ञानपीठ, वरोरा या शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष तथा महाराष्ट्र विधानसभेचे माजी उपाध्यक्ष स्वर्गीय ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या ८४ व्या जयंतीनिमित्त सामाजिक, शैक्षणिक आणि जनजागृतीपर उपक्रमांचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले. शिक्षण, समाजसेवा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जय गुरुदेव स्वच्छ जल संस्था, वरोराचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते रमेश राजुरकर  होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी सांगितले,  
_"स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांनी शिक्षणाला समाजपरिवर्तनाचे प्रभावी साधन मानले. विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानाबरोबरच संस्कार, सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाची भावना रुजविणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल."_

प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री गुरुदेव आश्रम, गुरुकुंज मोझरीचे माजी सर्वाधिकारी तथा शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते लक्ष्मणराव गमे यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले,  
_"माणसाचे व्यक्तिमत्त्व केवळ पदवीने नव्हे तर मूल्याधिष्ठित शिक्षणाने घडते. सेवा, श्रम आणि संवेदनशीलता या जीवनमूल्यांचा स्वीकार केल्यास समाज अधिक सक्षम होईल."_

यावेळी भद्रावतीचे नगराध्यक्ष प्रफुल्ल चटकी, नगरसेविका वृषालीताई पांढरे, लोकसेवा मंडळाचे सहसचिव अमित गुंडावार, सामाजिक कार्यकर्ते सुभानभाई सौदागर, विवेकानंद हायस्कूलचे मुख्याध्यापक तुकाराम पोफळे तसेच महाविद्यालयाचे डॉ. यशवंत घुमे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमात महाविद्यालयाच्या ‘विवेक’ या वार्षिकांकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. विद्यार्थ्यांच्या वैचारिक, साहित्यिक आणि सर्जनशील अभिव्यक्तीला प्रोत्साहन देणारा हा वार्षिकांक संस्थेच्या शैक्षणिक परंपरेचा महत्त्वाचा भाग असल्याचे मान्यवरांनी सांगितले.

जयंतीनिमित्त महाविद्यालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. तसेच आयोजित रक्तदान शिबिरात विद्यार्थी, प्राध्यापक आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत समाजसेवेची भावना प्रत्यक्ष कृतीतून व्यक्त केली. या उपक्रमांमुळे जयंती उत्सवाला केवळ औपचारिकतेचा नव्हे, तर सामाजिक उत्तरदायित्वाचा अर्थ प्राप्त झाला.

कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन समन्वयक प्रा. अमोल ठाकरे यांनी केले. प्रास्ताविक डॉ. यशवंत घुमे यांनी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ. नामदेव उमाटे यांच्या मार्गदर्शनात प्राध्यापक वृंद व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.

यावेळी स्व. ॲड. मोरेश्वरराव टेमुर्डे यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा आणि 
शिक्षण, सेवा व सामाजिक बांधिलकीची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

_______________________________

टेमुर्डे जयंतीनिमित्त भद्रावतीत सेवा उपक्रम 

विवेकानंद महाविद्यालयात ८४ व्या जयंतीनिमित्त ‘विवेक’ वार्षिकांक प्रकाशन, वृक्षारोपण व रक्तदान शिबिर. रमेश राजुरकर व लक्ष्मणराव गमे यांचे मार्गदर्शन.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या