Ticker

6/recent/ticker-posts

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्यातून ६८ लक्ष रुपयांचा महसूल

          
२५ हजार ९३७ पर्यटकांचा पर्यटन प्रवास *

साकोली:- रवि भोंगाने 

पर्यटनाचा केंद्रबिंदू असलेल्या वाघांमुळे निसर्ग पर्यटनात दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यामुळे राज्यातील व्याघ्र पर्यटनाकडे पर्यटक आकर्षित होऊ लागलेले आहेत. मात्र पर्यटन केवळ मनोरंजन की पर्यटनातून पर्यावरणाची जाणीव यावर प्रश्नचिन्ह उभे राहत आहेत. कोणत्याही कारणातून का होईना मात्र व्याघ्र पर्यटनाकडे वाढता कल असल्याने २०२५-२६  या वर्षात नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्यतून शासनाला २५ हजार ९३७ पर्यटकांपासून ६८ लक्ष १० हजार ४११ रुपयांचा  महसूल अद्याप पर्यंत जमा झालेला आहे. १ आक्टोंबर ते ३१ जून हा नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य पर्यटन काळ असतो. मधल्या ३ महिन्यात पावसाळा असल्याने पर्यटकांसाठी रस्ते गैरसोईचे असतात. पावसाळा आणि हिरवी ताजी रानराई यामुळे वन्यप्राणी बिनधास्तपणे स्वतःला मोकळे सोडतात. ना पर्यटकांचा गोंधळ, ना त्यांच्या मोबाईलचा फ्लॅश, ना पर्यटकांचा आवाज ( गोंगाट ), ना त्यांच्या वाहनांचा धुमाकूळ. त्यामुळे या ३ महिन्यात वन्यप्राणी ताजी तवानी होत असतात. परिणामी जुलै ते सप्टेंबर या ३ महिन्यासाठी नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येतो. परिणामी या तीन महिन्यात व्याघ्र प्रकल्पाला पर्यटकांपासून मिळणारा महसूल बंद असतो. 
महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्प केवळ व्याघ्र दर्शनाची केंद्रे न राहता संपूर्ण जंगल परिसंस्थेचा अनुभव देणारी निसर्ग पर्यटनस्थळे म्हणून विकसित करण्याची गरज वन्यजीव क्षेत्रातून व्यक्त होत आहे. व्याघ्र पर्यटनामुळे राज्याला महसूल, स्थानिकांना रोजगार आणि जंगलांना नवी ओळख मिळत असली तरी पर्यटनाचा केंद्रबिंदू अजूनही बहुतांश वाघा भोवतीच फिरत आहे. मात्र हे पर्यटन केवळ वाघापूरते मर्यादित न राहता त्याला निसर्ग पर्यटनाची जोड देण्याची मागणी वन्यजीव अभ्यासाकडून पुढे येत आहे. राज्यात ताडोबा-अंधारी, पेंच, मेळघाट, नवेगाव-नागझिरा, बोर आणि सह्याद्री असे ६ व्याघ्र प्रकल्प आहेत. गेल्या काही वर्षात या व्याघ्र प्रकल्पांकडे पर्यटकांचा ओघ सातत्याने वाढलेला आहे. त्यामध्ये हमखास होणारे व्याघ्रदर्शन एक प्रमुख कारण आहे. पर्यटनामुळे रोजगार व महसूल मिळत असला तरीही पर्यटन व्याघ्रकेंद्रीत झाला आहे. वाघ दिसला नाही तर बरेच पर्यटक निराश होतात. हे व्याघ्र केंद्रीय पर्यटन आपण थांबवू शकत नसलो तरी त्याला निसर्ग पर्यटनाची जोड देणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने आता विभागाने काम करण्याची गरज आहे. असे मत अनेक पर्यटकांनी व्यक्त केलेले आहे.
-----------------------------------------------

कोणत्याही ठिकाणचे पर्यटन हा एक केवळ मनोरंजनाचा भाग नसून तो अभ्यासाचासुद्धा भाग ठरतो. त्यामुळे पर्यटकांनी मनोरंजना बरोबरच पर्यावरणाची जाणीव ठेवावी. पर्यटनातून बऱ्याच गोष्टी मानवी जीवनास अभ्यास करायला शिकवितात. आणि हाच अभ्यास मग पर्यावरणाला पूरक ठरतो. जैवविविधता आहे म्हणून पर्यावरण आहे. पर्यावरण आहे म्हणून प्राणी पशु पक्षी आहेत आणि जैवविविधता, पर्यावरण, व प्राणी-पशु-पक्षी  या तिन्ही गोष्टी आहेत म्हणून पर्यटक आहे. त्यामुळे पर्यावरणाचे संवर्धन राखण्याची जबाबदारी प्रत्येक पर्यटकांची आहे. पर्यटकांनी केलेल्या पर्यटनातून पर्यावरण वाढवण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. पर्यटकांनी पर्यटना पुरते मर्यादित न राहता सातत्याने पर्यावरण वाढीसाठी कृतिशील राहावे.
 
प्रा. डॉ. अरुण झिंगरे. ( साकोली )
जैवविविध तज्ञ,
तथा प्राचार्य मनोहरभाई पटेल कॉलेज देवरी.

----------------------------------------------

पर्यटकांनी निश्चितपणे पर्यटनासाठी निघावे. त्याचा नैसर्गिक आनंदही घ्यावा. मात्र पर्यटनाला जातांना सोबत कोणत्या वस्तू घ्याव्यात आणि टाळाव्यात याचे बंधन प्रथम स्वतःला घालता आले पाहिजे. पर्यटक येतांना प्लास्टिकच्या पाणी बॉटल, जंख फूडचे पॉकेट, प्लास्टिकचे ग्लास आणि इतर टाकाऊ साहित्य घेऊन येतात आणि काम झाले की पर्यटनस्थळी बेफिकीरपणे, निष्काळजीपणाने, बेजबाबदारपणाने फेकून देतात. त्यामुळे सहाजिकच पर्यावरणाला बाधा पोहोचत असते. प्लास्टिक जमिनीत मुरत नाही, किंवा कुजतही नाही. त्यामुळे त्याचे दुष्परिणाम पर्यावरण वाढीसाठी घातक ठरतात. अनेक पर्यटक  पर्यटनासाठी येतात, त्यानंतर परिसरात पार्टी करतात आणि तिथेच मादक द्रव्यांच्या बाटल्या आणि इतर साहित्य फेकून देतात. त्यामुळे नक्की आपण पर्यटन करतो तरी कशासाठी ? असा प्रश्न आत्मचिंतन करून स्वतःला विचारणे आवश्यक आहे. पर्यटनाला बाधा पोहचणार नाही याचे भान प्रत्येकाने राखणे आवश्यक आहे. शहरातला कचरा, प्लास्टिक, घाण आता जंगलात येऊ लागलेली आहे. निसर्ग स्थळी खमंग पार्टी करण्याचे प्रमाण वाढलेले आहे. त्यामुळे जैवविविधतेने समृद्ध असलेला आमचा निसर्ग आपना सर्वांना अबाधित ठेवायचा असेल तर प्रत्येक पर्यटकांना प्लास्टिकचा उपयोग टाळावा लागेल. प्रत्येक पर्यटकांनी अशा कृतीची सुरुवात स्वतःपासून केली तर निसर्ग हा प्रत्येकाकरिता वरदान ठरेल, ठरत आला आहे आणि ठरणार आहे.
 
किरण पुरंदरे.
निसर्गप्रेमी, पक्षी तज्ञ पिटेझरी.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या