वाघांकरीता 'हॉट स्पॉट' ठरलेला नवेगाव-नागझिरा पुन्हा चर्चेत
साकोली:- रवि भोंगाने
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २ दिवसीय मशरूम व बुरशी जैवविविधता सर्वेक्षण आयोजित करण्यात आलेले होते. या बुरशी जैवविविधता सर्वेक्षणात मशरूमच्या शेकडो प्रजातीचा शोध लागल्याची माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे वन्य प्राण्यांसाठी राज्यात नव्हे तर राज्याच्या बाहेर सुप्रसिद्ध असलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्य पुन्हा प्रसिद्धीच्या झोतात आलेला आहे. मशरूमच्या शेकडो प्रजातीच्या या शोधामुळे नवेगाव- नागझिरा व्याघ्रप्रकल्प तथा अभयारण्याला संशोधनासाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. एकीकडे नवेगाव-नागझिरा व्याघ्रप्रकल्पात मशरूमच्या १०० हून अधिक प्रजातीची नोंद करण्यात आल्याने जैवविविधता क्षेत्रात नवेगाव-नागझिरा अभयारण्याचे विशेष महत्त्व अधोरेखित झालेले आहे तर दुसरीकडे विदर्भात वाघांकरिता यापूर्वी 'हॉट स्पॉट' ठरलेला नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प आता पुन्हा नव्याने पब्लिसिटी हॉट ठरलेला आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात मशरूमच्या शंभरहून अधिक प्रजातीची नोंद करण्यात आलेली आहे. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात २२ व २३ ऑगस्ट २०२६ ला दोन दिवसीय मशरूम व बुरशी जैवविविधता सर्वेक्षण करण्यात आले होते. यात बुरशीशास्त्र क्षेत्रातील ६ तज्ञ तसेच वन विभागातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेतला. सर्वेक्षणादरम्यान व्याघ्रप्रकल्पातील विविध अधिवासांमध्ये आढळणाऱ्या शंभरहून अधिक मशरूम प्रजातींची प्राथमिक नोंद करण्यात आली. माती, पालापाचोळा, मृत व कुजणारे लाकूड, पडलेले वृक्ष तसेच विविध वन अधिवासांमध्ये आढळणाऱ्या बुरशींचे निरीक्षण व दस्तऐवजीकरण करण्यात आले. या सर्वेक्षणामुळे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील अल्पज्ञात बुरशी जैवविविधतेचे वैज्ञानिक दस्तऐवजीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. नोंदवलेल्या प्रजातींची तज्ञांमार्फत पुढील शास्त्रीय ओळख व प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. सदर सर्वेक्षण हे महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ यांच्याकडून मंजूर प्रकल्पांतर्गत करण्यात आले असून याबाबत लवकरच वैज्ञानिक अहवाल सादर करण्यात येणार आहे अशी माहिती विभागीय वन अधिकारी अतुल देवकर यांनी दिली. हा सर्वेक्षण उपक्रम नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जैवविविधतेच्या वैज्ञानिक संवर्धन व व्यवस्थापनाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. या उपक्रमामुळे वन अधिकारी व क्षेत्रीय कर्मचाऱ्यांमध्ये बुरशी जैवविविधतेबाबत जागरूकता आणि क्षमता वृद्धीकरण होण्यासही मदत झाली असल्याचे मत क्षेत्र संचालिका पियुषा जगताप यांनी व्यक्त केले.
----------------------------------------------
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वाघांकरिता झाले 'हॉट स्पॉट'
महाराष्ट्रात वाघांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याची माहिती समोर येत आहे. नागपूर विभागात सर्वाधिक वाघ असून व्याघ्र प्रकल्पांच्या सीमा ओलांडून अनेक वाघ प्रादेशिक वनविभागाच्या क्षेत्रात तसेच गावांच्या परिसरात फिरतांना आढळत आहेत. त्यामुळे राज्यातील इतर व्याघ्र प्रकल्पाबरोबरच नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प अभयारण्यमध्ये वाघाची संख्या झपाट्याने वाढत आहे. पूर्व विदर्भाच्या ६ जिल्ह्यांमध्ये प्रादेशिक वन विभागाचे ३ वनवृत्त आणि १२ प्रादेशिक विभाग कार्यरत आहेत. त्यातील चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्हे वगळता वर्धा, भंडारा, गोंदिया व नागपूर या ४ जिल्ह्यांच्या प्रादेशिक वनक्षेत्रात किमान १२५ ते १३० वाघ हे व्याघ्र प्रकल्पाबाहेर गाव शेजारी फिरत असल्याचे स्पष्ट झालेले आहे. पूर्वी वाघ साधारणपणे २० किलोमीटरच्या आत भ्रमंती करायचे. परंतु वाघ हा एका ठिकाणी रामणारा वन्यप्राणी नसल्याने विदर्भातील वाघांनी आता शेकडो किलोमीटरचे नवनवीन कॅरिडॉर शोधली आहेत. असे असले तरी वन्यजीव विभागाच्या माहितीप्रमाणे नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात वाघाच्या संखेत वाढ झाल्याने सध्यातरी तरी व्याघ्र प्रकल्प वाघांकरिता ' हॉट स्पॉट ' ठरलेला आहे.


0 टिप्पण्या