Ticker

6/recent/ticker-posts

चंद्रपुरात 'यहोवा यीरे अर्बन सोसायटी'कडून ठेवीदारांची कोट्यवधींची फसवणूक; जिल्हाधिकाऱ्यांकडे न्यायासाठी साकडे!


प्रतिनिधी ✍️ राजेश येसेकर

चंद्रपूर : बचत आणि मुदत ठेवींच्या (FD) नावाखाली सर्वसामान्यांचे पैसे उकळून त्यांची बोळवण करणाऱ्या 'यहोवा यीरे अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी'च्या कारभाराविरुद्ध चंद्रपुरातील हवालदिल ठेवीदारांनी अखेर जिल्हाधिकारी कार्यालयावर काल दुपारी धडक दिली आहे. कष्टाची पुंंजी अडकल्याने संतप्त झालेल्या ग्राहकांनी जिल्हाधिकाऱ्यांना थेट निवेदन देऊन सोसायटीच्या संचालकांवर कडक कायदेशीर कारवाई करण्याची आणि रक्कम व्याजासह परत मिळवून देण्याची आग्रही मागणी केली आहे.  
पिडित ग्राहकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी सोसायटीच्या विविध आकर्षक योजनांमध्ये आपल्या हक्काचे पैसे गुंतवले होते. मात्र, ठेवींची मुदत पूर्ण होऊन आता सुमारे ८ ते १० महिन्यांचा कालावधी उलटला तरीही ग्राहकांना एक रुपयाही परत मिळालेला नाही. पैसे मागण्यासाठी गेल्यास सुरुवातीला १५ दिवस ते एका महिन्याची मुदत देऊन टाळाटाळ केली जात होती. आता तर सोसायटीने आपल्या सर्व शाखा अचानक बंद करून पळ काढल्याने ठेवीदारांमध्ये तीव्र संताप व भीतीचे वातावरण पसरले आहे.  
या गंभीर गैरव्यवहाराबाबत ग्राहकांनी यापूर्वी विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, चंद्रपूर यांच्याकडे रीतसर तक्रार दाखल केली होती. परंतु, दोन ते अडीच महिने उलटूनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही किंवा कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे हताश झालेल्या सुप्रिया लोहे, शैलेजा कुक्षीकांत, आकांक्षा मते, बापूजी ढवस, प्रकाश वरगंटीवार यांच्यासह अनेक ग्राहकांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे या आधीच धाव घेतली आहे.  काल परत काही एजंट व ग्राहकांनी तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय गाठले आहे.
आर्थिक अडचणीत सापडलेल्या या सर्वसामान्य नागरिकांना त्वरित न्याय मिळावा आणि दोषी संचालकांवर कठोर गुन्हे दाखल व्हावेत, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या