अविरोध निवड ही गावात एकतेचे दर्शन
चित्रा न्युज प्रतिनिधी
लाखनी (श.प्र.) :-लाखनी तालुक्यातील ग्रामपंचायत सिंदीपार/मुंडीपार येथे दिनांक 24 ऑगस्ट 2026 रोजी प्रशासक सौ. उमाताई भोयर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभा संपन्न झाली.या ग्रामसभेकडे संपूर्ण गावाचे लक्ष लागले होते. ग्रामसभेत गावाच्या विकासाचे विविध महत्त्वाचे ठराव पारित करण्यात आले. मात्र सर्वात महत्त्वाचा आणि चुरशीचा ठरलेला विषय म्हणजे महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्ष पदाची निवड.अध्यक्ष पदासाठी चर्चा सुरू होताच ग्रामस्थांनी एकमुखाने एकच नाव पुढे केले ते म्हणजे गावातील प्रतिष्ठित, अनुभवी आणि सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्व श्री. सुभाष चुन्नीलालजी पटले.यांच्या नावाची निवड.गावात कोणताही वाद नको, गाव तंटामुक्त राहावे या उद्देशाने सर्व गट-तट विसरून ग्रामस्थांनी श्री. सुभाष पटले यांची अविरोध, एकमताने आणि सर्वानुमते अध्यक्ष म्हणून निवड केली. या निर्णयाने सिंदीपार/मुंडीपार गावाने पुन्हा एकदा एकतेचा आणि आदर्शाचा संदेश दिला आहे.
*पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत*
निवड जाहीर होताच टाळ्यांच्या कडकडाटात ग्रामसभेने या निर्णयाचे स्वागत केले. उपस्थित सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी नवनियुक्त अध्यक्ष श्री. सुभाष पटले यांचे पुष्पगुच्छ देऊन जंगी स्वागत केले व अभिनंदन करून पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.यावेळी ग्रामस्थांनी सांगितले की, सुभाष पटले यांच्या अनुभवी नेतृत्वाखाली गावातील छोटे-मोठे वाद, भांडणे सामोपचाराने मिटतील आणि खऱ्या अर्थाने गाव तंटामुक्त होईल अशी आम्हाला पूर्ण अपेक्षा आहे.
प्रशासक सौ. उमाताई भोयर यांनी नवनियुक्त अध्यक्षांना शुभेच्छा देताना सांगितले की, शासनाचा तंटामुक्त गाव हा उपक्रम गावपातळीवर वाद मिटवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि पटले यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम यशस्वी होईल.या ऐतिहासिक ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.


0 टिप्पण्या