Ticker

6/recent/ticker-posts

इचलकरंजी राधाकृष्ण पाणी योजनेविरोधात ९ ऑगस्टपासून जुने दानवाड येथे बेमुदत साखळी उपोषण


चित्रा न्युज प्रतिनिधी 
जुने दानवाड :इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शिरोळ तालुक्यातील जुने दानवाड (कृष्णा-दूधगंगा नदी संगम) येथे प्रस्तावित करण्यात आलेली 'जुने दानवाड उद्भव राधाकृष्ण पाणी योजना' बेकायदेशीर असून ती कायमस्वरूपी रद्द करावी, या प्रमुख मागणीसाठी 'राधाकृष्ण संगमभूमी जलआक्रोश समिती, दानवाड पंचक्रोशी' च्या वतीने दिनांक ९ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता जुने दानवाड येथील तलाठी कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील कायदेशीर पूर्वकल्पना व आक्रमक निवेदनीकरण तहसीलदार, सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि तलाठी कार्यालयाला देण्यात आले आहे.

दानवाड पंचक्रोशीतील शेतकरी, बागायतदार, पशुपालक व ग्रामस्थांच्या जीवनमरणाराचा प्रश्न बनलेल्या या पाणी योजनेमुळे परिसरातील बागायती शेती, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि भूजल पातळी धोक्यात आली आहे. कृष्णा-दूधगंगा नदी संगमावरून तब्बल ८९ एमएलडी पाण्याचा अतिरिक्त उपसा केला गेल्यास संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्था उद्ध्वस्त होईल, असा गंभीर इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. भारतीय संविधानातील नागरिकांच्या जगण्याच्या अधिकारावर (कलम २१) आणि जलसुरक्षेवर या प्रकल्पामुळे थेट गदा येत असल्याचा आरोप समितीने केला आहे.

समितीच्या प्रमुख व कायदेशीर मागण्या
> १.  कृष्णा-दूधगंगा नदीपात्रातील जलस्रोतांवर मानवी व पर्यावरणीयदृष्ट्या जीवघेणा ताण आणणारी आणि दानवाड पंचक्रोशीतील शेतकरी व ग्रामस्थांचे जीवन उद्ध्वस्त करणारी राधाकृष्ण पाणी योजना शासनाने तात्काळ व कायदेशीररीत्या रद्द करावी.
> २. नदीकाठच्या गावांची बागायती शेती, पिण्याच्या पाण्याची गरज आणि भूजल पातळी लक्षात घेता, नदीतून अतिरिक्त पाण्याचा अनियंत्रित उपसा करण्यास कठोर प्रतिबंध करण्यात यावा.
> ३ इचलकरंजी शहरात असणारी ४०% ते ५०% पाण्याची तांत्रिक गळती तातडीने थांबवावी आणि पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्याचे जलशुद्धीकरण प्रकल्प शहराच्या हद्दीतच प्राधान्याने कार्यान्वित करावेत.

यापूर्वी प्रशासनाला आणि जिल्हाधिकारी कार्यालयाला कायदेशीर व लेखी हरकती नोंदवूनही कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.  निवेदनावर  माजी सरपंच संजय धनगर , अॅड राहुलराज कांबळे, दिनेश कांबळे पँथर आर्मी प्रमुख संतोष आठवले यांचा सह्या आहेत .
या आंदोलनाची प्रत माहिती व योग्य त्या कार्यवाहीसाठी मा. जिल्हाधिकारी (कोल्हापूर), मा. पोलीस अधीक्षक (कोल्हापूर), मा. प्रांताधिकारी (इचलकरंजी) आणि मा. उपविभागीय पोलीस अधिकारी (इचलकरंजी) यांच्याकडे सविनय सादर करण्यात आली आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या