Ticker

6/recent/ticker-posts

विरूर स्टेशन: युवा पिढीने हाती घेतले श्रमदान, ग्रामपंचायतकडून अभिनंदन

आपले गाव, आपली जबाबदारी'च्या भावनेतून स्वच्छता अभियान


चंद्रपूर प्रतिनिधी : राजेश येसेकर

चंद्रपूर : विरूर स्टेशन गावातील जागरूक व सुशिक्षित युवा पिढी स्वतःहून पुढे येऊन श्रमदानातून स्वच्छता अभियान राबवत आहे. तरुणांनी झाडू हातात घेऊन गाव स्वच्छ करण्याचा उपक्रम हाती घेतल्याने हा उपक्रम अत्यंत स्तुत्य, कौतुकास्पद आणि प्रेरणादायी ठरला आहे.

ही बाब ग्रामपंचायतीसाठी लाजीरवाणी नसून 'आपले गाव, आपली जबाबदारी' या लोकसहभागाची आणि श्री राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या 'ग्रामसफाई' संदेशाची जिवंत प्रचीती आहे, अशी भावना ग्रामस्थांमध्ये आहे.

गावातील तरुण विशाल देरकर, नानी राठोड, प्रेम श्रीकोंडावार, संस्कार निमलवार, शुभम भोस्कर, रोहन सोनी, श्रावण रेड्डी, करण कहार, अस्मित बोडेकर, स्नेहल मोरे, प्रतीक मोरे, साहिल अलोने, चेतन वरवाडे, अनिकेत चोचले, परिवर जीव तोडे, संजू वर्मा, आदित्य वर्मा, विकी सोनी, शीतिज तुराणकर, प्रवीण नांदेकर, पवन सोनी व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी केलेल्या श्रमदानाबद्दल ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने जाहीर सत्कार व अभिनंदन करण्यात येत आहे.
ग्रामपंचायत प्रशासनाने युवा सैनिकांच्या या सामाजिक जाणिवेचे कौतुक केले आहे.

ग्रामपंचायत विरूर स्टेशन ही नेहमीच गावाच्या आरोग्यासाठी व स्वच्छतेसाठी कटिबद्ध असल्याचे ग्रामपंचायत अधिकारी कातकर यांनी सांगितले. दैनंदिन कचरा संकलन आणि साफसफाईसाठी कर्मचारी कार्यरत आहेत. 

परंतु वाढती लोकसंख्या आणि सार्वजनिक ठिकाणी साचणारा कचरा यावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी नवीन कचराकुंड्यांची उभारणी व घंटागाडी/कचरा गाड्यांची नियमित फेरी याबाबतचे नियोजन अंतिम टप्प्यात आहे.

नागरिकांची आणि तरुणांची मागणी लक्षात घेऊन ग्रामपंचायत लवकरच विशेष स्वच्छता मोहीम राबवणार आहे. ज्या भागात कचराकुंडीची तातडीने गरज आहे, तिथे नवीन कचराकुंडी व कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहे.

ग्रामसेवक यांनी सांगितले की, "ग्रामपंचायत ही कुठल्याही एका संस्थेची किंवा कर्मचाऱ्यांची नसून संपूर्ण गावाची आहे. लोकसहभागाशिवाय कोणताही गाव पूर्णपणे स्वच्छ राहू शकत नाही. तरुणांनी दाखवलेली ही दिशा नक्कीच अभिनंदनीय आहे."
ग्रामपंचायत प्रशासन आणि गावातील युवा पिढी आता हात हात घालून विरूर स्टेशनला चंद्रपूर जिल्ह्यातील 'आदर्श व स्वच्छ गाव' बनवण्यासाठी एकत्र काम करणार आहे. 

गावातील नागरिकांनीही सार्वजनिक ठिकाणी कचरा न टाकता ग्रामपंचायतीच्या कचरा संकलन व्यवस्थेला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

_______________________________
विरूर स्टेशनमध्ये युवकांचा स्वच्छता उपक्रम 

तरुणांनी श्रमदानातून गाव स्वच्छ केले. ग्रामपंचायतकडून युवा पथकाचा जाहीर सत्कार. कचराकुंडी व घंटागाडीसाठी नियोजन अंतिम टप्प्यात. 'आदर्श गाव' बनवण्यासाठी ग्रामपंचायत-युवक एकत्र.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या