नगरसेवक गौरव नागपुरे यांचे मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
भद्रावती प्रतिनिधी : राजेश येसेकर
भद्रावती : शहरात वाढत्या मोकाट गायींच्या त्रासामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून, या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नगरसेवक गौरव सुभाष नागपुरे यांनी नगर परिषद मुख्याधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू सारंगधर उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, शहरातील विविध रस्ते, चौक आणि सार्वजनिक ठिकाणी मोठ्या प्रमाणात मोकाट गायी फिरत असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. तसेच अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे.
पादचारी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि दुचाकीस्वारांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याशिवाय अनेक ठिकाणी मोकाट जनावरे रस्त्यावर बसल्यामुळे वाहतूक कोंडी होत असून नागरिकांना दुखापत होण्याच्या घटनाही घडत आहेत.
त्यामुळे या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
नगरसेवक गौरव नागपुरे यांनी संबंधित विभागामार्फत शहरातील मोकाट गायी पकडून गोशाळेत किंवा योग्य ठिकाणी हलवण्याची व्यवस्था करावी, तसेच जनावरांच्या मालकांवर आवश्यक ती कायदेशीर कारवाई करून भविष्यात अशी समस्या निर्माण होणार नाही यासाठी प्रभावी उपाययोजना राबविण्याची मागणी केली आहे.
या निवेदनावर नगर परिषद प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
____________________________________
भद्रावतीत मोकाट गायींचा प्रश्न ऐरणीवर
शहरातील रस्ते-चौकात मोकाट गायींमुळे वाहतूक कोंडी व अपघात वाढले. नगरसेवक गौरव नागपुरे यांनी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले. गायी पकडून गोशाळेत हलविणे व मालकांवर कारवाईची मागणी. प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, अशी विनंती.


0 टिप्पण्या