Ticker

6/recent/ticker-posts

जि. प. प्राथमिक शाळा, निलागोंदी तर्फे वीर जवानांना राखी पाठवून जपले नाते, विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेमाचा जागर

चित्रा न्युज प्रतिनिधी 
लाखनी (श.प्र.):-रक्षाबंधन हा बहिण-भावाच्या अतूट प्रेमाचा सण. मात्र आपल्या देशाच्या सीमेवर, कुटुंबापासून दूर राहून अहोरात्र देशाचे रक्षण करणारे वीर जवान हेच आपले खरे भाऊ आहेत, ही भावना मनात ठेवून जि. प. प्राथमिक शाळा, निलागोंदी येथे एक अत्यंत हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला.शाळेतील उपक्रमशील शिक्षिका कु. दिपाली ठाकरे मॅडम व शाळेतील सर्व विद्यार्थिनी यांच्या संकल्पनेतून हाताने प्रेमाने, आपुलकीने आणि देशभक्तीच्या रंगात न्हाऊन सुंदर राख्या तयार करण्यात आल्या. या राख्या आज भारतीय पोस्टाच्या माध्यमातून देशाच्या सीमेवर तैनात असलेल्या वीर जवानांना पाठविण्यात आल्या आहेत.या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, सैनिकांप्रती आदर, कृतज्ञता, त्याग आणि राष्ट्रभक्ती या मूल्यांची रुजवण व्हावी हा होता. जेव्हा या चिमुकल्या हातांनी बनवलेल्या राख्या जवानांच्या मनगटावर बांधल्या जातील, तेव्हा त्यांनाही आपल्या घराची आणि बहिणीची आठवण येईल आणि त्यांचे मनोबल आणखी वाढेल.या छोटेखानी पण महान कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. योगेशजी पडोळे, उपाध्यक्ष श्री. शैलेशजी वंजारी, गावचे भूषण आणि सेवानिवृत्त सैनिक श्री. रमेशजी वंजारी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी सेवानिवृत्त सैनिक रमेशजी वंजारी यांनी विद्यार्थ्यांना सैनिकांच्या जीवनातील संघर्ष, शिस्त आणि देशसेवेचे महत्त्व समजावून सांगितले.हा संपूर्ण उपक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सेवा शिक्षक श्री. प्रफुल वंजारी, परिचर श्री. विकास वंजारी,स्वयंपाक मदतनीस सौ. कविताताई वरठे यांनी मोलाचे सहकार्य केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री. डी. जी. वंजारी सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली आणि सर्व शिक्षकांच्या सहकार्याने हा उपक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला.यावेळी विद्यार्थिनींनी "जय हिंद, जय जवान, वीर जवान अमर रहे" अशा घोषणा देऊन संपूर्ण परिसर देशभक्तीमय केला.या आगळ्या वेगळ्या उपक्रमाबद्दल जि. प. प्राथमिक शाळा, निलागोंदीचे सर्व स्तरातून कौतुक होत असून पालकांनीही समाधान व्यक्त केले आहे.
              "सीमेवर लढणारा प्रत्येक जवान हा आमचा भाऊ आहे. त्याच्या रक्षणासाठी आम्ही ही प्रेमाची राखी पाठवत आहोत."असे मनोगत कु. दिपाली ठाकरे, शिक्षिका हिने व्यक्त केले

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या