Ticker

6/recent/ticker-posts

वृक्षारोपणाचे कार्यक्रम फोटो इव्हेंटपुरते मर्यादित

            वृक्षारोपण कार्यक्रमांवरच प्रश्नचिन्ह 

साकोली: रवि भोंगाने 

" नेमेची येतो पावसाळा " या प्रमाणे नेमेची येते वृक्षारोपण असे म्हणायला हरकत नाही. साल बादाप्रमाणे हे वृक्षारोपणाचे कार्यक्रम नेहमी होत असतात. परंतु अलीकडच्या काळात या वृक्षारोपण कार्यक्रमावरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून वृक्षारोपणाचे कार्यक्रम फोटो सेशन पुरतेच मर्यादित ठरत आहेत का ? यावर आता आत्मचिंतन करण्याची वेळ सर्वांवर आलेली आहे. दरवर्षी हे कार्यक्रम केवळ फोटो इव्हेंट ठरत असतील तर वृक्षारोपण कार्यक्रमाची नौटंकी बंद करा असा संतापजनक सवाल आता नागरिकांमधून समोर येत आहे. ' वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ' असे शेकडो वर्षापूर्वी संत तुकाराम आपल्या लोकप्रिय अभंगातून सांगून गेले. शेकडो वर्षांपूर्वीच्या अभंगाचे महत्त्व केवळ फोटोसेशन मर्यादित पुरते मर्यादित राहू नये याकरिता याचे महत्त्व सर्वांना पटवून देणे आवश्यक झालेले आहे. परंतु या अभंगाचे गांभीर्य कुणीच पूर्णपणे मनावर न घेतल्याने सध्या वृक्षारोपण कार्यक्रम " शो-पीस " म्हणून दिसून येत आहे. दरवर्षी हे वृक्षारोपण कार्यक्रम घेतले जातात. नर्सरीमधून झाडे आणून ठिकठिकाणी वृक्षारोप केले जातात. अनेक जण या कार्यक्रमाचे आपल्या परीने इव्हेंट तयार करतात. एकदा हा कार्यक्रम आटोपला की झाडांसाठी खोदलेला खड्डाही दिसत नसतो, झाडही नसतो आणि झाड लावणाऱ्या व्यक्तीला सुद्धा आपण कुठे झाड लावले याचाही पत्ता नसतो. त्यामुळे वृक्षारोपणाच्या नावावर नर्सरीमधून आणलेल्या झाडांचा पार बट्ट्याबोळ केला जात आहे. वृक्षारोपणासाठी जी झाडे नर्सरीतून आणली जातात त्या झाडांची रोपटे तयार करण्यासाठी वनविभाग या रोपवाटिकावर लक्षावधी रुपये दरवर्षी खर्च करीत असतो. शेकडो मजुरांचे हात या रोपांची लागवड करण्याकरिता रोपवाटिकेत राबत असतात. याकरिता वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना रोपांच्या वाढीकडे पाळत ठेवावे लागते. मात्र लक्षवधी रुपये खर्च केलेल्या रोपट्यांचे वृक्षारोपण निमित्ताने सत्यानाश केला जात असल्याचे दुर्दैवी चित्र आता समाजासमोर येत आहे. मागील वर्षी वृक्षारोपण केलेले झाड यावर्षी दिसत नाही. यावर्षी वृक्षारोपण केलेली झाड पुढच्या वर्षी दिसत नाही आणि तिसऱ्या वर्षी वृक्षारोपण करणाराही ( अपवाद ) दिसून येत नाही. त्यामुळे वृक्षारोपणाचे कार्यक्रम दरवर्षी फोटो सेशन इव्हेंट होऊ लागले असे धाडसाने म्हणायची वेळ आता नागरिकांवर आलेली आहे.
----------------------------------------------
वृक्षरोपणाचा कार्यक्रम मनापासून राबवावा. ज्यांनी कार्यक्रम राबविला त्यांनी त्या झाडांचे संवर्धन करण्याची जबाबदारी स्वतः स्वीकारावी. ज्याने झाड लावले त्यांनी त्याच ठिकाणी आपण लावलेले झाड पुढच्या वर्षी बघावे आणि तो फोटो सोशल मीडियावर टाकावा. झाड एक दिसतो फोटोमध्ये १० ते १५ दिसतात. मग दहा ते पंधरा जणांनी झाडाचे संवर्धन करण्याची जबाबदारी का स्वीकारू नये ? आपली शोकांतिका हीच आहे की, ( अपवाद वगळता ) वृक्षारोपणाचे कार्यक्रम फोटोसेशन पुरते मर्यादित होत आहेत.  झाडांविषयी एवढेच प्रेम असेल तर त्या झाडा समोर आपले नाव लिहावे. म्हणजे ज्यांनी झाड लावले त्याचे झाड जगले की नाही याची माहिती सर्वसामान्य नागरिकांना पुढच्या वर्षी होईल. केवळ फोटो सेशनचा तमाशा सुरू आहे तो आधी बंद करावा. 

अतुल गणविर.
सामाजिक कार्यकर्ता 
गूढरी ( नीलागोंदी ) त. साकोली
-----------------------------------------------

दरवर्षी झाडांचे वृक्षारोपण होत आहेत तर मग ही झाडे जातात कुठे ? म्हणजे फक्त प्रसिद्धीपुरते झाडे लावायचे काय ? यावर्षी ज्यांनी झाडे लावली त्यांचे फोटो प्रसिद्धी माध्यमाकडे आहेत. त्यांनी हे फोटो जपून ठेवावे आणि पुढच्या वर्षी हेच फोटो त्यांना दाखवावे की झाडे गेलीत कुठे ? प्रसिद्धी माध्यमाची जबाबदारी आहे की अशा फालतू माणसांना प्रसिद्धी देऊ नये. बाप दाखव नाही तर झाड दाखव अशी म्हणायची वेळ येत असेल तर वृक्षरोपण कार्यक्रमांचा तमाशा बंद करावा. अपवाद वृक्षप्रेमी वगळता झाडाविषयी कोणालाही प्रेम, आपुलकी नाही. वृक्षरोपणाचा कार्यक्रम केवळ देखावा ठरू लागलाय.

 अशोक रंगारी.
 जि.प. सेवानिवृत्त शिक्षक, साकोली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या