शिवमंदिरामध्ये जल्लोष
साकोली: रवि भोंगाने
सण उत्सवाची रेलेचेल आणि सांस्कृतिक धार्मिक कार्यक्रमांचा आनंद मिळवून देणाऱ्या चैतन्यमयी वातावरणातील पवित्र श्रावण मासाला गुरुवारपासून सुरुवात झालेली आहे. या पवित्र महिन्याची रेलचेल ११ सप्टेंबर २०२६ रोज शुक्रवार पर्यंत राहणार आहे. यंदाच्या श्रावणात एकूण ४ श्रावणी सोमवार आले आहेत. या श्रावण महिन्यात भगवान शिवाची आराधना केली जाते. त्यामुळे श्रावणात भगवान शिवाच्या आराधनेला अतिशय महत्त्व येत असते. संपूर्ण महिना भगवान शंकराच्या व माता-पार्वतीच्या पूजेसाठी अत्यंत शुभ मानला जातो. या निमित्याने सगळीकडे तयारीला वेग आला असून उत्साहाचे वातावरण भारावलेले आहे. हिंदी पंचांगानुसार श्रावणमास सुरू होणार असल्याने त्यापूर्वीच धार्मिक तयारीला वेग आलेला होता. हा महिना भगवान शिवाचा सर्वाधिक प्रिय महिना मानला जातो. या महिन्यात भगवान शंकराचे व्रत, उपवास, रुद्राभिषेक बेलपत्र अर्पण करून महादेवाचा नामजप आणि विशेष पूजा केली जाते. देवी पार्वती सुद्धा या काळात उपस्थित असल्याचे पुराणांमध्ये सांगितले जाते. संपूर्ण महिनाभर पूजा विधी आणि जलाभिषेक परंपरा पार पाडली जाणार आहे.
______________________________________________
जलाभिषेक आणि पूजेचे नियोजन
_______________________________________________
श्रावण महिन्यातील सोमवारी विशेषता: व्रत करण्यात येतात. त्या दिवशी भगवान शिवाचा अभिषेक दूध, दही, मध, साखर, तूप, बेलपत्र आणि जलाने अभिषेक केला जातो. ओम: नमो: शिवाय: आणि महामृत्युंजय मंत्राचे पठण केले जाते. गंगाजल, नर्मदाजल किंवा स्थानिक नदीतून भरलेले शुद्ध जल अर्पण करताना मंत्राच्या उच्चारणात भक्त शिवलिंगावर जलाभिषेक करीत असतात. श्रावण महिना आहार, विहार, आचरण, विचारांचे संयम आचरणात आणण्याचा काळ मानला जातो. अनेक भाविक पूर्ण महिनाभर उपवास करतात तर काहीजण फक्त सोमवारी उपवास करीत असतात. कांदा, लसूण, मासांहार आणि मद्यपान यांचे संपूर्ण वर्जनकेले जाते. या श्रावण महिन्याच्या निमित्ताने शिवभजन, नामस्मरण, कथावाचन, ध्यान आणि रुद्राभिषेक या गोष्टीवर भर दिला जातो. याच श्रावण महिन्यात शिवमंदिरामध्ये शिव उपासना करण्याची प्रथा आहे. श्रावणाच्या आगमनाची प्रतीक्षा संपत असताना पाऊस बरसण्यासह सणासुदीसह चैतन्यदायी आणि प्रफुलित वातावरण निर्माण होत असते. श्रावणी सोमवार, मंगळागौर, नागपंचमी, रक्षाबंधन आणि श्रीकृष्ण जन्माष्टमी अशा विविध सणाची आठवण व्हायला लागते.
_______________________________________________
श्रावण महिन्याचे महत्त्व असे की, या महिन्यात रात्रीच्या प्रारंभी पूर्वेला श्रवण नक्षत्र उगवते आणि रात्रभर आकाशात राहून पहाटे पश्चिमेस मावळतो. तसेच श्रावण पौर्णिमेला चंद्र श्रवण नक्षत्रापाशी असतो. म्हणून या महिन्याला श्रावण असे नाव मिळाले आहे. देवशयनी एकादशीला श्री विष्णू योगनिद्रेत गेल्यानंतर सृष्टीचा सगळा कारभार आणि पालनाची जबाबदारी महादेव शिवशंकर यांच्या वर असते असे मानले जाते. त्यामुळे या काळात महादेवाची उपासना व नामस्मरण करण्यावर विशेष भर दिला जातो.


0 टिप्पण्या