सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज
पालघर: उत्तर कोकण विभागातील पालघर हा निमखारे, खारे आणि गोड्या पाण्यातील विपुल जलसाधन संपत्तीमुळे, कृषी पर्यटना बरोबरच मस्यव्यवसायासाठी वैविध्यपूर्ण संधी उपलब्ध असून कृषी विद्यापीठ, केंद्रीय संस्था, मत्स्यव्यवसाय विभागाच्या माध्यमातून निधीची भरीव तरतूद करणार असल्याचे पालघर जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी प्रतिपादन केले.
डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत मुंबईस्थित तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र आणि जिल्हा नियोजन समिती - पालघर यांच्या आर्थिक सहकार्यातून राबविण्यात येत असलेल्या प्रकल्पाअंतर्गत "मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील व्यवसाय संधी" या विषयावरील एक दिवशीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर तारापोरवाला सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राचे डॉ. सुधाकर इंदुलकर, पालघर जिल्ह्याचे सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्त दिनेश पाटील, संशोधन केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ प्रा. शरद पाटील, डॉ. भावेश सावंत, डॉ. शार्दुल गांगण, जीवशास्त्रज्ञ रविंद्र बोंद्रे, पालघर येथील कृषि संशोधन केंद्राचे प्रमुख विजय सागोवकर, आयसीएआर- नवसारी येथील केंद्रीय संस्थेचे डॉ. पंकज पाटील, प्रगतीशील शेतकरी सुहास भांडकोळी इत्यादी अधिकारी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यालगत, मत्स्यसंवर्धनास खूप वाव आहे. जिल्हामध्ये समुद्री - मासळीमध्ये दर्जेदार धारा तसेच पापलेट मासळीचे उत्पन्न होते. याशिवाय, वडराई किनाऱ्या जवळील 'जवळा' अतिशय उत्कृष्ट असून आपल्या कोकण किणारपट्टीवर उपलब्ध होणारे मासे अतिशय उत्कृष्ट असल्याचेही जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी सांगितले. मासा हा एक नाशवंत खाद्य प्रकार असून काढणी पश्चात तो टिकावा यासाठी विशेष प्रयत्न करणे गरजेचे आहे. पालघर विभागातील आदिवासी भागामध्ये पोषणयुक्त 'प्रथिने' मिळण्यासाठी मत्स्य किंवा मासळी हा एक चांगला पर्याय आहे. आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी मत्सव्यावसायामध्ये भाग घ्यावा असे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आवाहन केले.
चर्चासभामध्ये प्रथमत: डॉ. पंकज पाटील यांनी निमखाऱ्या पाण्यातील पिंजरा संवर्धन, याबाबत सविस्तर माहिती दिली. सुहास भांडकोळी यांनी जलाशयातील पिंजरा संवर्धन याबाबत माहिती दिली. डॉ. भावेश सावंत यांनी शोभिवंत मत्स्यपालन याविषयावर विस्तृत माहिती दिली व स्वयंरोजगाराच्या संधीबाबत माहिती दिली. जीवशास्त्रज्ञ रविंद्र बोंद्रे यांनी शेततळ्यातील मत्स्यसंवर्धन याबाबत माहिती दिली. चर्चासभामध्ये एकूण 70 लोकांनी सहभाग नोंदाविला. डॉ. शार्दुल गांगण यांनी आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.


0 टिप्पण्या