सिद्धार्थ डोंगरे विशेष प्रतिनिधी महा.चित्रा न्युज
वर्धा: जिल्हा परिषद आणि अर्पण सामाजिक संस्था मुंबईच्यावतीने प्राथमिक शिक्षक, मुख्याध्यापक तसेच केंद्रप्रमुख यांच्यासाठी 'बाल लैंगिक शोषणास' प्रतिबंध करणाऱ्या वैयक्तिक सुरक्षा शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन जिल्ह्यातील सर्व तालुक्यांच्या ठिकाणी करण्यात आले आहे. वर्धा तालुक्याचा कार्यक्रम नुकताच केसरीमल कन्या शाळा येथे घेण्यात आला.
यावेळी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॅा.मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी (माघ्यमिक) सचिन जगताप, उपशिक्षणाधिकारी (माघ्य) उषा तळवेकर, उपशिक्षणाधिकारी (प्राथ.) संजय मेहरे उपस्थित होते. यावेळी मार्गदर्शकांनी मुल आणि मुलांचे अधिकार, बाल शोषण आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकार, आकडेवारी, बाल लैंगिक शोषणाचा अल्पकालीन आणि दीर्घकालीन प्रभाव, पोक्सो कायदा आणि तरतूदी या बाबत माहिती दिली. 6 ते 16 वयोगटातील मुलांसाठी गोष्टींवर आधारित मुलांना वैयक्तिक सुरक्षा शिक्षणाचे आणि ऑनलाईन ई-लर्न कोर्सचा परिचय, प्रतिबंधात्मक धडे देऊन मुलांचे जीवन कौशल्यावर आधारित माहिती देऊन त्यांचे सक्षमीकरण करण्याबाबत सादरीकरण करण्यात आले.
मुलांचे प्रकटीकरण कसे हाताळावे याबाबत देखील माहिती देण्यात आली. प्रकाटनाचे प्रकार आणि बाल लैंगिक शोषणाचे प्रकरण हाताळताना शिक्षकांनी कोणत्या कौशल्याचा वापर करावा याबाबत अद्ययावत माहिती यावेळी देण्यात आली.
यावेळी अर्पण संस्थेचे तज्ञ प्रशिक्षक सोनाली परब, सुरज सापळे, रसिका सिरसाट, अमेय कोरगावकर, श्रद्धा जाधव, दिपाली कदम, शुभांगी शिंदे, साफिना शेख, कुसुम नाईक, कोमल मधे, अनुष्का भट, राजनारायण मौर्या आणि आकाश अहिरे हे मार्गदर्शन म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला विषय साधन व्यक्ती, केंद्र प्रमुख, विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


0 टिप्पण्या