Ticker

6/recent/ticker-posts

प्रपत्र "ब" मधील २३ पात्र लाभार्थी घरकुलाचे प्रतीक्षेत


प्रशासनाने नजर चुकीने केले होते रद्द

लाखनी पंचायत समिती मधील प्रकार

कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 95459 14324

भंडारा:- प्रपत्र ब मधील घरकुलास पात्र लाभार्थ्यांची यादी संपुष्टात येऊन प्रपत्र ड मधील लाभार्थ्यांना चालू आर्थिक वर्षात घरकुल देण्याची प्रक्रिया सुरू झाली असली तरी लाखनी पंचायत समिती प्रशासनाच्या नजर चुकीने ब यादीतील रद्द केलेल्या पात्र घरकुल लाभार्थ्यांच्या प्रश्नावर जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडून कसलीही कार्यवाही केली गेली नसल्यामुळे ते २३ पात्र लाभार्थी घरकुलाचे प्रतीक्षेत आहेत. 
         मातीच्या पडक्या , कच्च्या व मोळकडीस आलेल्या तथा भाड्याचे घरात वास्तव्यास असलेल्या दारिद्र्य रेषेखालील आणि गरीब कुटुंबास घरकुल योजनेचा लाभ देण्यात येतो. अनुसूचित जातीसाठी रमाई आवास , अनुसूचित जमाती साठी शबरी आवास तथा इतर प्रवर्गातील लाभार्थ्यांकरिता प्रधानमंत्री आवास योजना चालविली जाते. लाखनी तालुक्यात ७१ ग्रामपंचायतीत १०४ गावे समाविष्ट असून त्यात १० रिठी गावे आहेत. शासनाने २०१६ पासून प्रधानमंत्री आवास योजना सुरू केली असून प्रपत्र ब मध्ये ७ हजार ६४६ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यापैकी ४१२ अतिक्रमण व जागा नसलेले लाभार्थी आहेत. तसेच २३ नजरचुकीने अपात्र ठरलेले व १२ लाभार्थी शिल्लक असले तरी चालू आर्थिक वर्षापासून शासनाने प्रपत्र ड मधील लाभार्थींना घरकुल उपलब्ध करण्याच्या सूचना केल्या आहेत. लाखनी तालुक्यात प्रपत्र ड मध्ये १३ हजार ३४६ लाभार्थी असून त्यापैकी २ हजार ९०० लाभार्थ्यांना निकषामुळे रद्द ठरविण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२१-२२ मध्ये लाखनी पंचायत समिती ला ११६६ घरकुलांचे उद्दिष्ट देण्यात आले असून अनुसूचित जाती जमातीस ८१६ तर इतर लाभार्थ्यांना ३५० घरकुलाचा लाभ देण्यात येणार आहे. 
         पंचायत समिती प्रशासनाच्या नजर चुकीने भूगाव , दिघोरी , डोंगरगाव/साक्षर , जेवनाळा , कवलेवाडा , मानेगाव/सडक ३ , पालांदूर , पेंढरी , पिंपळगाव/सडक ३ , सामेवाडा , रेंगेपार/कोहळी , कोलारी २ , मरेगाव , रामपुरी , खेडेपार , कनेरी , विहिरगाव इत्यादी १७ गावातील प्रपत्र ब मधील २३ पात्र लाभार्थ्यांना रद्द करण्यात आले होते. ही चूक लक्षात आल्यानंतर गटविकास अधिकारी पंचायत समिती लाखनी यांनी पत्र क्रमांक पसलां/बांध/घरकुल/२८०६/२०२१ दिनांक ९ ऑगस्ट २०२१ ला प्रकल्प संचालक ग्रामीण विकास यंत्रणा भंडारा यांचेशी पत्र व्यवहार केला व अनेकदा स्मरणपत्र देऊनही कसलीही कार्यवाही केली गेली नाही. त्यामुळे त्या २३ पात्र लाभार्थ्यांचे घरकुलाचे स्वप्न भंगणार काय ? असा प्रश्न निर्माण होतो. ग्रामीण विकास यंत्रणेने लवकरात लवकर ह्या २३ लाभार्थ्यांचे प्रस्तावास मान्यता देणे आवश्यक झाले आहे.

प्रतिक्रिया
पंचायत समिती च्या घरकुल विभागात अनागोंदी कारभार सुरू असून पात्र लाभार्थ्यांना डावलून श्रीमंत व्यक्तींना घरकुलाचे लाभ दिल्याने पात्र लाभार्थ्यांवर अन्यात होत आहे. प्रपत्र-ब मधील १७ गावातील २३ पात्र लाभार्थ्यांना तत्काळ घरकुलाचा लाभ देण्यात यावा. 
आकाश कोरे, माजी जि. प. सदस्य

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या