महापालिकेचे नुकसान, नागरिकांना मन:स्ताप
निलेश देव यांचे आयुक्तांना निवेदन
चंद्रशेखर वाघमारे पपु निवळीकर संपादक महा चित्रा न्युज मो.8888117975
अकोला- महानगरपालिकेने गेल्या काही वर्षांपूर्वी शहरातील मालमत्ता कराचा भरणा ऑनलाईन पद्धतीने करण्यासाठी वेबसाईटच्या माध्यमातून ऑनलाईन भरणा प्रणाली सुरू केली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून ही ऑनलाईन प्रणाली बंद असल्याने महानगरपालिकेचे नुकसान होत आहे. शिवाय शहरातील जे मालमत्ताधारक बाहेरगावी राहतात त्यांना ऑनलाईन मालमत्ता कर भरण्यामध्ये प्रचंड अडचणी येत आहेत. त्यामुळे आयुक्तांनी या प्रकरणी दखल घेऊन ऑनलाईन मालमत्ता करप्रणाली पूर्ववत करावी यासाठी सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी आयुक्तांना निवेदन सादर केले.
गेल्या काही वर्षांपूर्वी एका खाजगी कंपनीद्वारे अकोला शहरातील मालमत्तांचा सर्वे करून मालमत्ता कर नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने भरता यावा यासाठी एक वेबसाईट प्रारंभ करून या वेबसाईट द्वारे ऑनलाईन कर भरणा प्रणाली सुरू करण्यात आली होती. या वेबसाईटचे काम पूर्ण झाल्यानंतर ऑनलाईन कर भरणा प्रणालीबाबत संबंधित कंपनीने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देणे आवश्यक होते. प्राप्त माहितीनुसार गेल्या काही दिवसांपूर्वी या कंपनीचे काम बंद करण्यात आल्याचे समजते. त्यानंतर आता नागरिकांना ऑनलाइन कर भरण्यामध्ये मोठ्या अडचणी येत आहेत. एक तर ही ऑनलाईन कर भरणा प्रणाली ओपन होत नाही किंवा ओपन झाली तरी या प्रणाली द्वारे नागरिकांना कर भरता येत नाही. काही नागरिकांनी ऑनलाईन प्रणाली द्वारे कर भरल्यानंतर दोन-तीन दिवसात ते पैसे त्यांच्या खात्यात परत आलेत. त्यामुळे नागरिकांना ऑनलाइन पद्धतीने कर भरण्यात प्रचंड अडचणी निर्माण झालेल्या आहेत. नागरिकांना मोठा मन:स्ताप होत आहे. कुणाचे पैसे भरले गेले परंतु त्याला पावतीच मिळाली नाही.
या सगळ्या घोळामुळे महानगरपालिकेचे नुकसान होत आहे आणि नागरिकांना मन:स्ताप होत आहे. नागरिकांचा ऑनलाईन व्यवहारांकडे कल वाढला असून अनेक नागरिक ऑनलाईन पद्धतीने आपले व्यवहार करतात. शिवाय जे नागरिक बाहेरगावी राहतात ते नागरिक आपल्या अकोला शहरातील मालमत्तांचे कर ऑनलाईन पद्धतीने भरतात. परंतु या सगळ्या घोळामुळे ऑनलाइन कर भरणा रखडलेला असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याप्रकरणी आयुक्तांनी लक्ष देऊन ही यंत्रणा लवकरात लवकर सुरुवात करावी, अशी मागणी ॲड. धनश्री देव स्मृती सेवा प्रकल्पाचे प्रमुख, सामाजिक कार्यकर्ते निलेश देव यांनी केली आहे.


0 टिप्पण्या