• सिंधी लाईन चौक महामार्गावरील घटना
• पोलिसांत गुन्हा दाखल
कालिदास खोब्रागडे जिल्हा विशेष प्रतिनिधी भंडारा मो. 9545914324
भंडारा :- भरधाव वेगाने व निष्काळजीपणे मोटरसायकल चालवून पायी जात असलेल्या रिक्षा चालकास धडक देऊन गंभीर जखमी केल्याची घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३ वरील सिंधी लाईन चौकात गुरुवारी(ता.२७) सकाळी ९:३० वाजताचे सुमारास घडली. जखमीचे नाव ओमप्रकाश देवाजी मोटघरे(६५) रा. सावरी/मुरमाडी, तालुका लाखनी असे आहे. पोलिसांनी मोटरसायकल चालकावर गुन्हा दाखल केला असून पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात तपास सुरू आहे.
रिक्षा चालक ओमप्रकाश मोटघरे हे गुरुवारी सकाळी ८:०० वाजता रिक्षा चालविण्याकामी घरून गेले होते. ९:३० वाजताच्या सुमारास संजय मोहनकर यांच्या भ्रमणध्वनी वरून जखमीची पत्नी आशा मोटघरे हिला फोन आला व तुझ्या पतीचा सिंधी लाईन चौकात मोटरसायकल क्रमांक एमएच ४० झेड ५६४८ चे चालकाने धडक देऊन जखमी केले आहे. त्याला ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. असा निरोप मिळाल्याने पत्नी ग्रामीण रुग्णालयात गेली असता कर्तव्यावर असलेल्या वैद्यकिय अधिकाऱ्याने प्रथमोपचार करून प्रकृती अत्यवस्थ असल्यामुळे पुढील उपचारासाठी सामान्य रुग्णालय भंडारा येथे पाठविण्यात आले. पत्नी आशा मोटघरे हीचे फिर्यादीवरून लाखनी पोलिसांनी अपराध क्रमांक २९५/२०२३ अन्वये गुन्हा दाखल केला असून कलम २७९, ३३७, ३३८ भादवि तथा मोटारवाहन कायदा सहकलम १८४ नुसार पोलिस निरीक्षक मिलिंद तायडे यांचे मार्गदर्शनात पोलिस नायक श्रीकांत वाघाये तपास करीत आहेत. रिक्षा चालकास धडक दिल्यानंतर मोटारसायकल चालक सुद्धा जखमी झाला. पण वृत्त लिही पर्यंत त्याचे नाव कळू शकले नाही.


0 टिप्पण्या