चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात- पालकमंत्री शंभूराज देसाई
रुपाली मेश्राम कार्य.संपादक चित्रा न्युज मो.9552073515
सातारा :- मुले घडवण्याचा पाया हा प्राथमिक शाळेत रचला जातो. त्यामुळे तेथील वातावरण चांगले असणे गरजेचे आहे. चांगल्या वातावरणात चांगली मुले घडतात, असे प्रतिपादन पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण बहुउद्देशिय सभागृहात पालकमंत्री श्री. देसाई यांच्या हस्ते माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमाचा शुभारंभ झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी महादेव घुले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी शबनम मुजावर, नितीन धायगुडे आदी उपस्थित होते.
निधी खर्चाच्या बाबतीत बदल करून त्यामध्ये सुसूत्रता आणण्याची गरज होती असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, शाळा चांगल्या करणे गरजेचे आहे. शाळांसाठी चांगला निधी दिला जाईल. आपल्या शाळा आदर्श करण्यासाठी पालक आणि ग्रामस्थ यांनीही सहभाग घेणे गरजेचे आहे. त्यासाठी सरपंच, मुख्याध्यापक आणि शिक्षक यांनी लोकांमध्ये या विषयी माहिती द्यावी. आजच्या या कार्यक्रमात पहिल्या टप्यात ५० शाळांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात किमान ४०० आदर्श शाळा तयार करण्यात येणार असल्याचे पालकमंत्री श्री देसाई यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जिल्ह्याकडे विशेष लक्ष असल्याचे सांगून पालकमंत्री श्री देसाई म्हणाले, हा एक चांगला उपक्रम असून यामध्ये लोकप्रतिनिधी, अधिकारी, शिक्षक व ग्रामस्थ या सर्वांनी सहकार्याने काम करावे. आदर्श शाळे सोबतच आदर्श प्राथमिक आरोग्य केंद्र ही जिल्ह्यात उभारण्यात यावीत. खासगी रुग्णालयांच्या धर्तीवर त्यांचा विकास करावा. शिक्षण व आरोग्य क्षेत्रात जिल्हा अग्रेसर बनवूया. ग्रामीण जनतेला सर्व सोयी सुविधा पुरवण्याच्या प्रत्येक कामात शासन आपल्या सोबत असल्याचेही ते म्हणाले.
यावेळी खासदार श्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांच्या कला गुणांना वाव मिळणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी अशा आदर्श शाळा उभारण्यात येत आहेत. त्यामध्ये लोकांचा सहभाग वाढविण्यासाठी गावातील दानशूर व्यक्तींना आवाहन करावे. सर्वांनी एकत्र काम करून हा उपक्रम राबवूया.
जिल्हाधिकारी श्री डुडी यांनी या उपक्रमाची सविस्तर माहिती संगणकीय सादरीकरणाच्या माध्यमातून दिली. आदर्श शाळांमध्ये संगणक कक्ष, ग्रंथालय, प्रयोगशाळा, किचन गार्डन या सुविधा असणार आहेत. त्यासह संरक्षक भिंत, क्रीडांगण, सौर ऊर्जा यांचाही अंतर्भाव असणार आहे. मुलांच्या कौशल्य विकासासोबतच शैक्षणिक गुणवत्ता वाढीकडेही विशेष लक्ष दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकात मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. खिलारी यांनी या उपक्रमाची माहिती दिली. तसेच शाळांमध्ये ई लर्निग स्टुडिओ उभारला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शिक्षणाधिकारी श्रीमती मुजावर यांनी केले. यावेळी ई लर्निग व ई कामवाटप यांचाही शुभारंभ करण्यात आला.
यावेळी गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, आदर्श शाळा उपक्रम सुरू करण्यात आलेल्या ५० गावांमधील सरपंच, जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक मोठ्यासंख्येने उपस्थित होते.
०००००
सातारा जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभाग अंतर्गत असणा-या जिल्हा परिषद व्यवस्थापनाच्या सर्व प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक गुणवत्ता, अध्ययन-अध्यापनाचा दर्जा सुधारण्यासाठी आणि पुरेशा प्रमाणात भौतिक सुविधा उपलब्ध करुन देणेबाबत माझी शाळा-आदर्श शाळा निर्मिती उपक्रम राबविण्यात येत आहे.
माझी शाळा आदर्श शाळा निर्मिती मध्ये तीन महत्त्वाचे भाग असतील भौतिक सुविधा, शैक्षणिक सुविधा, लोकसहभाग यांचा समावेश आहे..
जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातून एका शाळेची निवड करणे,
शालेय भौतिक सुविधा व सुधारणांमध्ये वाढ करणे,
सर्व सोयी सुविधा उपलब्ध करुन देणे.
शैक्षणिक गुणवत्ता वाढीस प्रोत्साहन देणे,
लोकसहभाग वाढविणे,
शालेय वातावरण सुशोभित व प्रसन्न करणे,
मुलांचा शारिरीक , बौध्दिक व मानसिक विकास करणे,
विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभय देणे,
त्रयस्थ संस्थेमार्फत शाळांचे गुणवत्ता तपासणीसाठी मूल्यांकन करणे या बाबी या उपक्रमांतर्गत करण्यात येणार आहेत.
शाळा निवडीचे निकष पुढीलप्रमाणे
• सातारा जिल्ह्यातील प्रत्येक केंद्रातून एक शाळा माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांसाठी निवडणे.
• इयत्ता 1 ली ते 8 वी ची शाळा असावी
• शाळेची पटसंख्या जास्त असावी
• शाळेचे एकूण क्षेत्र मोठे असावे.
माझी शाळा आदर्श शाळा उपक्रमांसाठी निवडलेलया तालुकानिहाय शाळा संख्या
सन 2022-23 या पहिल्या टप्प्यामध्ये जावली 3, कराड 7, खंडाळा 4, खटाव 4, कोरेगाव 4, महाबळेश्वर 4, माण 4, पाटण 5, फलटण 4, सातारा 6, वाई 5, अशा एकूण शाळांची संख्या 50 आहे.
1. जावली तालुकयामध्ये केळघर, कुडाळ, मेढा तसेच 2. कराड मध्ये कोळेवाडी खोडशी, तुळसन, वाघेश्वर, पेंबर. 3. खटाव तालुक्यामध्ये सिध्देश्वर कुरोली, शासकीय विदयानिकेतन पुसेगांव, पुसेसावळी नं २, दरूज, 4. सातारा तालुक्यामध्ये क्षेत्रमाहुली, अपशिंगे, वर्णे, अंगापूर नं १, कोडोली, नागठाणे 5. पाटण तालुक्यात म्होवशी, नाडे, वेखंडवाडी , नुणे, मारुल हवेली, 6. वाई तालुक्यात शिरेगाव, बावधन, बोपर्डी, कवठे, पसरणी इ. 7. माण तालुक्यात विरकरवाडी, पानवण, वळई, सोकासन इ. 8. महाबळेश्वर तालुक्यात मेटगुताड, राजपुरी, भिलार, तापोळा इ. 9. फलटण तालुक्यात तरडगांव, माझेरी, हिंगणगाव, बरड इ. 10. खंडाळा तालुक्यात शिंदेवाडी, खंडाळा, अंदोरी, शिरवळ मुले इ. 11. कोरेगाव तालुक्यात एकंबे, सोनके, जळगांव, ल्हासुर्णे इ. शाळा आदर्श शाळा निर्मितीमध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत.
माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमांतर्गत अपेक्षित भौतिक सुविधा पुढीप्रमाणे
नवीन वर्गखोल्या, शाळा दुरुस्ती, नवीन स्वच्छतागृह, स्वच्छतागृह दुरुस्ती, हॅन्ड वॉश स्टेशन, नवीन संरक्षक भिंत, संरक्षक भिंत दुरुस्ती, क्रीडांगण विकसन, सोलर पॉवर पॅनल पॅक, घनकचरा व्यवस्थापन / सोकपीठ, स्वयंपाकगृह / किचनशेड, पेव्हिंग ब्लॉक, किचन गार्डन, परसबाग, वृक्ष लागवड, स्वागत कमान / प्रवेश द्वार, रेन वॉटर हार्वेस्टिंग, बाला रचनेप्रमाणे रंगकाम, क्रीडा साहित्य खरेदी, ग्रंथालय पुस्तक खरेदी, प्रयोगशाळा साहित्य खरेदी, संगणक खरेदी, फर्निचर खरेदी, सायन्स पार्क व बालोद्यान.
अशा भौतिक सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहेत.
भौतिक सुविधा परिपूर्ण करणेसाठी आवश्यक निधी खालील पर्यायातून उपलब्ध होईल.
जिल्हा नियोजन समिती, जलजीवन मिशन, 14/15 वा वित्त आयोग, नरेगा, जि.प. स्वीय निधी, क्रीडा विभाग, स्थानिक विकास निधी, सेवाभावी संस्था (NGO) लोकसहभाग, समाजकल्याण.
सुसज्ज वर्ग खोल्या, ग्रंथालय आणि सुसज्ज संगणक कक्ष, अंमलबजावणी, प्रयोगशाळा अंमलबजावणी, स्वच्छतागृहे , स्वच्छतागृहांची दुरुस्ती, शालेय पोषण आहार, पिण्याचे पाणी, संरक्षक भिंत, क्रीडांगण विकास या सर्व सुविधांच्याद्वारे विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता पूर्ण विकास निश्चितपणे होईल.


0 टिप्पण्या